पाताळगंगा नदीतून वाहतोय विनाशकारी फेस
| रसायनी | वार्ताहर |
खालापुर तालुक्यासह रसायनी पाताळगंगा हा परिसर औद्योगिकीकरणाने वेढलेला आहे. येथील विविध रासायनिक कंपन्यांच्या दूषित पाण्यांमुळे पाताळगंगा नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीच्या पेयजल योजना पाताळगंगा नदीवर अवलंबून आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. संबंधित विभागाने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
प्रदूषणकारी दिवाळी साजरी करत असल्याचे चित्र पहावयास मिळाले, तर ऐन दिवाळी सणापासून नदीपात्रात प्रचंड प्रमाणात फेस दिसून येत आहे. पाताळगंगा नदीत पंधरा दिवसांपूर्वी मृत माशांचा खच आढळून आला होता. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी चिंता व्यक्त केली होती. मात्र या विरोधात कोणतीही कारवाई करण्यात आल्याचे दिसत नाही.
प्रदूषण मंडळाने याबाबत दखल घेत पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले होते. परंतु याबाबत कठोर कारवाई होत नसल्याने याचा फायदा विविध कंपन्या घेत आहेत. गेल्या काही दिवसापासून नदीपात्रात फेसयुक्त पाणी मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे जलचरांच्या जिवाशी खेळ सुरु असून प्रशासनाने केवळ सणापुरते प्रदूषणाबाबत जागरुकता दाखविण्यापेक्षा प्रदुषणाला जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईं करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.