| रायगड | प्रतिनिधी |
गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. याचाच परिणाम म्हणून कोकण आणि घाटमाथ्यावर अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. राज्यातील इतर भागातही पावसाचा जोर असला तरी कोकण, घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे.
मागील 15 दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. त्यानंतर पुन्हा शुक्रवारपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यात 24 तासात सरासरी 80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अंबा आणि कुंडलिका नद्यांनी इशारा पातळी ओलांडली असून, नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग भागात गुरुवारपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या भागात शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला असून रायगड जिल्ह्यातील कुंडलिका आणि अंबा नद्यांनी पाण्याची इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रोहा, कोलाड, वाकण, खारघाव, खेड या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, रत्नागिरीसह रायगड, पुणे घाट परिसर , सातारा घाट परिसरात शनिवारी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यानुसार या कालावधीत जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. पुणे घाट परिसरातही पावसाचा जोर आहे. धरणक्षेत्रातही पावासाचा जोर वाढला आहे.
मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. कुंडलिका आणि अंबा नद्यांनी सकाळी 10 वाजता इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे रोहा आणि नागोठणे परिसराला पूरपरिस्थितीचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नदी किनाऱ्यांवरील गावांना सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यात सखल भागात पाणी साचणे, वीज पुरवठा खंडीत होणे आणि वृक्ष उन्मळून पडणे यासारख्या घटना घडल्या आहेत.
रोहे तालुक्याला शुक्रवार पासून मुसळधार पावसाने पार झोडपून काढले आहे. सलग दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून नदी तुडुंब भरून वाहत आहे. मागील अनेक दिवस विश्रांती घेतल्यानंतर शुक्रवार पासून पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाल्याने साऱ्यांची दाणादाण उडाली आहे. संततधार कोसळणाऱ्या पावसाने रोहे शहर व तालुक्यातील ग्रामीण भागाला चांगलाच फटका बसला आहे.विश्रांतीनंतर अचानक सक्रिय झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. रोहे शहराप्रमाणे चणेरा, भालगाव, कोलाड, सुतारवाडी, नागोठणे, सुकेळी खिंड या भागात देखील पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली. सतत पडणाऱ्या पावसामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर दुसरीकडे कुंडलिका नदीत पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली आहे.
मुळशी, रवाळजे परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे भीरा जलविद्यूत प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडण्यात आले असून, प्रतिसेकंद 62 घन मीटर वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे कुंडलिका नदीच्या पातळीत आणखिन वाढ होण्याची शक्यता आहे. सावित्री, पाताळगंगा आणि उल्हास नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान पुढील दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे.
जिल्ह्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत सरासरी 2 हजार 313 मिलीमीटर पाऊस पडतो, त्या तुलनेत यंदा 1 हजार 551 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत यावर्षी जिल्ह्यात 67 टक्के पाऊस पडला आहे. ही एक चिंताजनक बाब आहे. गेल्या वर्षी याच 15 ऑगस्टपर्यंत 2 हजार 372 मिलीमीटर पाऊस पडला होता. म्हणजेच सरासरीच्या तुलनेत अधिक पावसाची नोंद झाली होती. यावर्षी मात्र पावसाचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येत आहे.
कमी दाब क्षेत्र
बंगालच्या उपसागरातील कमी दाब प्रणालीमुळे राज्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. उत्तर आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत कमी दाब क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागून समुद्रसपाटीपासून 7.6 किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारे वाहत आहेत. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा बिकानेरपासून, कोटा, रायपूर, उत्तर आंध्र प्रदेशाच्या किनाऱ्यालगत असलेल्या कमी दाब क्षेत्राच्या केंद्रापर्यंत सक्रिय आहे. ईशान्य अरबी समुद्रात गुजरात आणि कोकणाच्या किनारपट्टीलगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा ते कमी दाबाच्या केंद्रापर्यंत 3.1 ते 4.5 किलोमीटर उंचीपर्यंत हवेचा पूर्व-पश्चिम कमी दाबाचा पट्टा कायम आहे.
