| रायगड | प्रतिनिधी |
उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या कार्यालयात गुरुवारी (दि.18) दुपारी 12 वाजता रस्ता अदालत आयोजित करण्यात आली आहे. या रस्ता अदालतीमध्ये अलिबाग व मुरुड तालुक्यातील व या न्यायालयातील संबंधित सर्व मान्यवर विधिज्ञ, संबंधित पक्षकारांच्या पुढाकाराने रस्त्यांविषयक प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यात येणार आहे. यासाठी दाखल असलेल्या प्रकरणांमध्ये होणाऱ्या सुनावणीकामी संबंधित विधिज्ञ व त्यांचे पक्षकार यांनी समेटाने मिटणाऱ्या प्रकरणांमध्ये लेखी म्हणणे न चुकता सादर करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी अलिबाग मुकेश चव्हाण यांनी केले आहे.
महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांशी अत्यंत जवळून संबंध असलेला विभाग आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने, शासन, महसूल व वन विभागाकडील निर्णय दि.01 सप्टेंबर 2025 अन्वये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन दि.17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दि.02 ऑक्टोंबर 2025 पर्यतच्या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा राज्यभर राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. या अभियानामध्ये पहिल्या टप्यामध्ये पाणंद रस्तेविषयक मोहिम राबविण्याची आहे. यास्तव उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या न्यायालयाकडील प्रलंबित असलेल्या रस्ते विषयक प्रकरणांमध्ये या न्यायालयात दि.18 सप्टेंबर 2025 रोजी रस्ता अदालतचे आयोजन करण्यात आलेले आहे.







