तिघा तरुणांच्या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक
| उरण | प्रतिनिधी |
तालुक्यातील पिरकोण-वशेणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती, खडी, मुरुम पडल्याने या रस्त्यावरुन दुचाकी, रिक्षा घेऊन जाणेही कठीण बनले होते. मात्र, प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही किंवा उपाययोजना होईल याची वाट न बघता सारडे गावातील नितीन म्हात्रे, त्रिजन पाटील आणि पाले गावातील हरिश म्हात्रे यांनी स्वत:च पुढाकार घेऊन श्रमदान करून सदर रस्त्याची साफसफाई केली. त्यांच्या या समाजाभिमुख कामाबद्दल सामाजिक कार्यकर्ते नागेश म्हात्रे व प्रवासी नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
उरण, पनवेल तालुक्याचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांच्या वर्दळीबरोबर माती, खडी, मुरुम भरलेले डंपरची अवैधरित्या वाहतूक राजरोसपणे रात्री-अपरात्री सुरू असते. अशा वाहनांमधील माती, खडी, मुरुम रस्त्यावर पडल्याने दुचाकीला व इतर वाहनांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे. त्यात निष्पाप लोकांचा नाहक बळी जातो. या सर्व घटनेची दखल, स्थानिक ग्रामपंचायत, सार्वजनिक बांधकाम विभाग, सिडको, तहसील कार्यालय तसेच संबंधित प्रशासन घेत नसल्याने तालुक्यातील रस्त्यांवर सर्रासपणे माती, खडी, मुरुम पडल्याचे चित्र दिसून येत आहे.
तालुक्यातील पिरकोण-वशेणी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती, खडी, मुरुम पडल्याने या रस्त्यावरुन दुचाकी, रिक्षा घेऊन जाणेही कठीण बनले होते. सारडे गावातील नितीन म्हात्रे,त्रिजन पाटील आणि पाले गावातील हरिश म्हात्रे यांनी अपघाताला कारणीभूत ठरु पाहणाऱ्या सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वत:च पुढाकार घेऊन नुकताच श्रमदान करून सदर रस्त्याच्या साफसफाईचे काम हाती घेतले आहे. त्याच्या या समाजाभिमुख कामाबद्दल सामाजिक कार्यकर्ते नागेश म्हात्रे व प्रवाशी नागरीकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
