| मुरूड | वार्ताहर |
मुरूड नगरपरिषदेच्या नव्याने तयार करण्यात येणार्या नाल्यांच्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती व दगड पसरल्याने बाजारपेठ रस्त्यावर धुळवड होत आहे. या कामी ठेकेदाराचा हलगर्जीपणामुळे नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. रस्त्यावर पडलेल्या खडी व मातीमुळे नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या कामी नगरपरिषद अधिकारी दुर्लक्ष करिता असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
शहरातील विकास कामांचा धुमधडाका जोरात सुरू आहे. पण या कामात ठेकेदार बेजबाबदार पणे काम करीत असल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. गटारांची पाच फुटी खोली असल्याने अपघात होण्याची शक्यता आहे. गटारातील माती रस्त्यावर पसरलेल्या अवस्थेत आहे. त्यातील खडी सर्वत्र पसरलेली आहे. या रस्त्यावर वाहतूक सुरू असल्याने वाहनांच्या वेगाने रस्त्यावरील माती घरात जात आहे. गाड्यांच्या टायर खालून रस्त्यावर पसरलेली खडी उडून घरात जात आहे. रस्त्यावर जात येत असलेल्या नागरिकांच्या खडी लागत आहे. दुकानात धुळीचे लोट जात आहेत. त्यामुळे दुकानदारांच्या मालाचे नुकसान झाले आहे.
या कामात ठेकेदाराने नागरिकांसाठी कोणत्याही स्वरूपाची सुरक्षाव्यवस्था केलेली नसल्याने नगरपरिषदेच्या अधिकार्यांनी लक्ष देउन रस्त्यावर पडलेली खडी व माती साफ करावी व या ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.