| खांब-रोह । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील रोहे-खांब मार्गावरील उडदवणे येथील रस्त्याला मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसल्याने येथील रस्त्याचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
जुलै महिन्याच्या दुसर्या आठवड्यात पावसाने आपला जोर वाढल्याने नदी, नाले व ओढे ओसंडून वाहू लागले. पर्यायाने सर्वत्र पुर परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वच क्षेत्राला त्याचा फटका बसला. उडदवणे येथील कालवा ओसंडून वाहू लागल्याने कालव्यातील ओव्हरफ्लो झालेल्या पाण्यामुळे बाजूच्या मुख्य रस्त्याचे मोठे नुकसान झाले आहे. रस्त्याची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने एका बाजूचा रस्ता वाहून गेला आहे. अर्धा रस्ताच वाहून गेल्याने येथून मार्गक्रमण करताना मोठीच खबरदारी घ्यावी लागत आहे. त्यातच या मार्गावर सतत मोठी रहदारी चालू असल्याने संभाव्य अपघाताचा धोकाही वाढला आहे.
येथील परिस्थितीचा अंदाज आला नाही तर बाजूच्या खचलेल्या रस्त्यामुळे चुकून अपघात झाला तर गंभीर समस्या निर्माण होऊ शकते. अशा परिस्थितीत संबंधित शासन यंत्रणेने या धोकादायक भागाची पाहणी करून लवकरच योग्य ती उपाययोजना करावी जेणेकरून संभाव्य धोका टळला जाऊ शकेल. अशाप्रकारची प्रतिक्रिया येथील रहिवासी व प्रवासी वर्गातून केली जाऊ लागली आहे.