एका महिन्यात रस्त्याची चाळण

। नेरळ । प्रतिनिधी ।

कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील नेरळ गावातील रस्त्याची एका महिन्यात चाळण झाली आहे. या रस्त्यावरील कर्जत तालुक्यातील रस्त्याचे जून महिन्याच्या सुरुवातीला डांबरीकरण करण्यात आले होते. दरम्यान,रस्त्याची चाळण झाल्याने वाहनचालक यांना मोठा त्रास होत असून त्या खड्ड्यांमुळे रस्त्यावरील वाहतूक धीम्या गतीने होत आहे.

कर्जत-कल्याण रस्त्यावरील कर्जत तालुक्यातील 21 किलोमिटर लांबीचा रस्ता हायब्रीड तत्त्वावर बनविण्यात आला होता. त्यानंतर दरवर्षी रस्त्याची दुरुस्ती संबंधित रस्त्याचे ठेकेदार यांच्याकडून करण्यात येत असते. त्यानुसार संबंधित ठेकेदाराने वडवलीपासून शेलू या भागातील रस्त्याचे डांबरीकरण जून 2024 मध्ये रस्ता दुरुस्त करण्याच्या कामात केले होते. त्यामुळे यावर्षी पावसाळ्यात कर्जत कल्याण राज्यमार्ग रस्ता सुस्थितीत असणार असे वाहनचालक यांना वाटले होते. मात्र, जून महिन्यात जेमतेम पाऊस पडला असतानादेखील या पावसात रस्त्यावरील डांबर वाहून गेले असून खड्डे पडले आहेत. यामुळे आता या रस्त्यावरील वाहतूक धीमी झाली आहे.

Exit mobile version