विविध तक्रारींचे करण्यात आले निराकरण
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्यात 19 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला, ज्याचा उद्देश शासनाच्या विविध सेवा लोकांपर्यंत पोहोचवणे आणि महसूल प्रशासनाला अधिक कार्यक्षम बनवणे हा होता. या अभियानात स्वयंसेवी संस्था आणि प्रशासनाने मिळून लोकाभिमुख उपक्रम राबवले, तसेच जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर जोर दिला. त्यात पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, ज्या पाणंद रस्त्यांची नोंद शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतीपत्र घेणे. रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्यांचे प्रलचित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे ही कार्यवाही करायची होती. त्या अनुशंघाने कर्जत तालुक्यात सेवा पंधरवडामध्ये भूमिअभिलेख विभागाकडून अनेक प्रलंबित दावे निकाली काढण्यात या विभागाला यश आले आहे. तर सात गावांचे पाणंद रस्ते हे पूर्ववत करण्याचे काम याकाळात यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. तर वैयक्तिक दावे देखील निकाली निघाले असून वनपट्टे, फेरफार अर्ज, नक्कल अर्ज, तक्ररी यांचा निपटारा करण्यात हा विभाग यशस्वी झाला आहे.
तालुक्याचे भूमी अभिलेख विभागाचे उप अधीक्षक नितीन आटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत तालुक्यात सेवा पंधरवडा सप्ताह साजरा करण्यात आला. या काळात कर्जत तालुक्यात अनेक वर्षे प्रलंबित असलेले दावे तक्रारी निकाली काढण्याचा पर्यटन या विभागाच्या माध्यमातून करण्यात आला. फेरफार अदालत घेऊन शेतकरी खातेदार यांचे अनेक प्रलंबित फेरफारांना मंजुरी देण्यात आली. शेतकरी आणि खातेदार यांचे प्रलंबित दावे यांच्यावर कर्जत येथील कार्यालयात अदालत घेण्यात आली. त्यावेळी एकत्रिकरण तक्रारींचा निपटारा, नक्कल अर्ज, फेरफार अर्ज, वनपट्टे मोजणीच्या नकलांचे वाटप आणि विविध तक्रारींचे निराकरण करण्यात आले. मात्र, त्याचवेळी अनेक गावांना भेडसावणाऱ्या पाणंद रस्त्यांचा प्रश्न गावोगावी भेटी देऊन सोडवण्याचा प्रयत्न या कालावधीत करण्यात आला. त्यात सात गावांमधील पाणंद पाणवठ्याकडे जाणारे रस्ते हे पूर्ववत करण्यात गावभेटीत यश आले. त्यासाठी उप अधीक्षक नितीन आटाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भूमापक अपेक्षा भोईर, शैलेश जाधव, संजय गायकवाड, रामचंद्र कवठे, निलेश हराळ, किरण जावरे, यांनी सनद वाटप कार्यक्रम गावोगावी जाऊन यशस्वी केला.
पाणंद रस्ते खुले
चिंचवली, चेवणे, आनंदवाडी, हूमगाव, डोणे, कोंदिवडे, जामरुंग या गावातील पाणवठ्याकडे जाणारे रस्ते खुले करून त्यांची सनद वाटप करण्यात आली. तर तालुक्यातील सहा गावातील झुगरेवाडी, वावळोली, कशेळे, चाफेवाडी, बोरिवली आणि वडवली या गावातील प्रलंबित दवे देखील सेवा पंधरवडा येथे निकाली काढून सनद वाटप करण्यात आली.







