‘मायबीएमसी मार्ग’ एकात्मिक तक्रार व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित
। मुंबई । प्रतिनिधी।
नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘मायबीएमसी मार्ग’ ही एकात्मिक तक्रार व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीद्वारे नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित विविध 114 प्रकारच्या तक्रारी एकाच अँप्लिकेशनद्वारे नोंदविता येणार असून त्यांचा पाठपुरावा देखील करता येणार आहे. या अंतर्गत ‘MyBMC MARG’ प्रणालीवर रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.
गतवर्षी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतच्या तक्रारी नोंदविण्यासाठी ‘Pothole QuickFix’ हे स्वतंत्र मोबाईल अँप्लिकेशन पालिकेने सुरू केले होते. या उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. दरम्यान, नागरिकांना अधिक सुलभ सेवा उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून यंदापासून ‘MyBMC MARG’ ही सर्वसमावेशक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. या प्रणालीमध्ये ‘Pothole QuickFix’ हे मोबाईल अँप्लिकेशन एकत्रित करण्यात आले आहे. त्यानुसार, रस्त्यांवरील खड्डे, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी समस्या, पाणीपुरवठा, रस्ते देखभाल, उद्याने, सार्वजनिक आरोग्य, कीटक नियंत्रण, अतिक्रमण, यांसह महानगरपालिकेच्या विविध विभागांशी संबंधित एकूण 114 प्रकारच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा ‘MyBMC MARG’ वर उपलब्ध आहे.
अँड्रॉइड वापरकर्ते नागरिक MyBMC MARG – Apps on Google Play आणि आयफोन वापरकर्ते नागरिक MyBMC MARG App – App Store या लिंकचा वापर करून आपल्या स्मार्टफोनमध्ये MyBMC MARG अँप्लिकेशन डाउनलोड करू शकतात. मुंबईकर नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांबाबतच्या सर्व तक्रारी ‘MyBMC MARG’ प्रणालीवरच नोंदवाव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
