| पाली/वाघोशी | प्रतिनिधी |
पाली-खोपोली महामार्गावरील खड्ड्यांचे साम्राज्य पाहून गणेशभक्त व प्रवाशांचा संताप उसळला आहे. वारंवार तक्रारी करूनही एमएसआरडीसी प्रशासन व कंत्राटदारांनी याकडे कानाडोळाच केला आहे. त्यासाठी निधी खर्च होतो, कामे दाखवली जातात. परंतु, प्रत्यक्षात रस्त्यावर खड्ड्यांचे जाळे कायम असल्याचे चित्र आहे. प्रशासनाच्या या निष्क्रियतेला कंटाळून राबगाव गावातील नवतरुणांनी थेट रस्त्यावर उतरून खड्डे बुजवले आहेत. या युवकांनी प्रशासनाच्या बेपर्वाईवर झणझणीत अंजन घालत स्वतःच्या मेहनतीने रस्त्यांची डागडुजी केली आहे. दिलदोस्ती ग्रुपच्या सोहम जाधव, प्रणव सानप, तेजस टिकवणे, प्रणित सानप, सार्थक जाधव, तनिष सानप, अनुज मोहिते, प्रवीण घायले व प्रेम टिकोणे या युवकांनी रस्त्यांची डागडुजी केली. खड्डे बुजवून झाल्यानंतर या तरुणांनी गणरायाच्या चरणी हात जोडून ‘आता तरी शासनाने जागे व्हावे व कायमस्वरूपी रस्त्यांची दुरुस्ती व्हावी’ अशी प्रार्थना केली. तसेच, कोट्यवधींचा निधी मंजूर होऊनही रस्ते आम्हाला बुजवावे लागत असतील, तर मग स्थानिक नेते आणि कंत्राटदारांची गरज तरी काय, असा थेट सवाल युवकांनी प्रशासनाला विचारला आहे.






