बाइकर्सकडून रस्ता सुरक्षेचे धडे

बाईक रॅलीद्वारे युवकांमध्ये जनजागृती
सुरक्षित प्रवासासाठी अनोखी संकल्पना
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा प्रशासन, जिल्हा वाहतूक शाखा व रायगड बाइकर्स फेस्टिव्हल यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी रस्ता सुरक्षा जनजागृतीचे संदेश देत बाईक रॅली अलिबाग शहरातून काढण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे,  निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी स्नेहल उबाले, वाहतूक विभागाचे निरीक्षक खेडकर यांच्यासह रायगड बाइकर्स फेस्टिव्हलचे अध्यक्ष प्रसाद चौलकर, राष्ट्रीय युवा पुरस्कार्थी तपस्वी गोंधळी आदी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यात ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी तसेच स्थानिक युवकांना सुरक्षित प्रवासाचे महत्त्व पटवून देण्यासाठी रायगड बाईकर्स फेस्टिव्हलची संकल्पना गेली सहा वर्षे राबविण्यात येत आहे. देशात दरवर्षी लाखो लोक रस्ते अपघातात जखमी किंवा मृत्युमुखी पडतात. अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि विशेष करून युवा वर्गाला सुरक्षित प्रवासासंबंधी जागृत करण्याकरिता रस्ता सुरक्षा जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रसाद चौलकर यांनी सांगितले.

या रॅलीमध्ये रस्ते सुरक्षा, अवयवदान तसेच मतदार जनजागृतीबाबत कार्यक्रम राबविण्यात आले. ही रॅली जिल्हा वाहतूक शाखा अलिबाग येथून सुरु होऊन  हिराकोट तलाव-वेधशाळा-जुनी नगरपालिका-एसटी डेपो-बीएसएनएल ऑफिसमार्गे बायपास रोड-बिकानेर-सेंट मेरी शाळा-ठिकरूळ नाका-शिवाजी महाराज पुतळा- बालाजी मंदिर-अलिबाग बीच अशी पार पडली.

Exit mobile version