रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेचा पुढाकार
| अलिबाग | भारत रांजणकर |
वाहतुकीचे नियम मोडणार्यांवर कारवाईचा बडगा उगारुन ‘लायसन्स दाखवा’ म्हणणारे पोलीसच आता शिकाऊ वाहन चालकांना ‘लर्निंग लायसन्स’ देण्यासाठी सहाय्य करणार आहे. रायगड पोलिसांच्या वाहतूक शाखेने यासाठी पुढाकार घेतला आहे. युवा वाहन चालकांना शिकाऊ परवाना (लर्निंग लायसन्स) काढून देण्यासाठी वाहतूक पोलीस विभागात सहाय्यता केंद्र सुरु करण्यात आले आहे. विना परवाना वाहन चालवणार्या वाहन चालकांवर कारवाई करत असतात. नियमांवर बोट ठेवत दंड आकारण्यात हयगय करत नाहीत. त्यामुळे ते टीकेचे धनीही ठरतात. युवा पिढी बरेचदा कारवाईच्या भीतीने वाहतूक पोलीस दिसले की रस्ता बदलून पळ काढतात. वाहतूक पोलिसांची जनमानसातील ही छबी बदलण्यासाठी रायगडच्या वाहतूक विभागाने प्रयत्न सुरु केले आहेत. युवक-युवतींना शिकाऊ वाहन परवाना काढून देण्यासाठी वाहतूक पोलीस सहाय्य करणार आहेत. यासाठी त्यांनी अलिबाग येथील वाहतूक पोलीस विभागात सहाय्यता केंद्रही सुरु केले आहे. वयाची 18 वर्ष पूर्ण करणार्या युवा युवतींना वाहतूक पोलिसांकडून शिकाऊ वाहन परवाना काढण्यासाठी मदत केली जाणार आहे. वाहन परवाना काढून देण्यापूर्वी पोलीस त्यांना वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शनही करणार आहेत.
आतापर्यंत 100 जणांना परवाने
जिल्ह्यात ठिकठिकाणी कॅम्प घेऊन महाविद्यालयीन तरुण-तरुणींचे वाहन परवाने काढून देणार आहेत. यात वाहन चालकांचे नियमांबाबत प्रबोधनही केले जाणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत दोन कॅम्प लावून 100 हून अधिक जणांचे लर्निंग लायसन्स देण्यात आले असल्याची माहिती वाहतूक पोलीस विभागाने दिली आहे.
- ज्या युवकांना लर्निंग लायसन्स काढायचे असेल त्यांनी वाहतूक शाखेत येऊन भेटावे, त्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. वाहतूक नियमांबाबत मार्गदर्शनही केले जाईल. महाविद्यालयांनी तयारी दर्शवली तर विशेष कॅम्प लावूनही शिकाऊ वाहन परवाने देण्यासाठी सहाय्यता करण्याची आमची तयारी आहे. – राजेंद्र पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक, रायगड