आगरदांडा जेटीचा रस्ता उद्घाटनाच्या प्रतीक्षेत

रस्ता झाल्याला सहा महिने पूर्ण; प्रवाशांना खराब रस्त्यावर करावे लागतेय मार्गक्रमण

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड आगरदांडा जेटीकडे जाणारा जुना रस्ता अतिशय खराब झाला असल्यामुळे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने तीन कोटी खर्चून समुद्रालगत सिमेंटचा रास्ता बांधण्याचे काम तीन वर्षांपूर्वी सुरु केले. रस्ताच्या दर्जावरून अनेक वाद झाले. सर्व त्रुटी पूर्ण करून रस्ता पूर्ण होऊन सहा महिने झालेत तरी अजूनही रस्ता पर्यटकांसाठी खुला करण्यात आला नाही. तयार झालेल्या रस्त्यावर झाडे उगवलीत. दिवाळी हंगामात हजारो गाड्या व लाखो पर्यटक जंगल जेटीमार्गे मुरुडकडे आले व गेले. त्यांना त्याच जुन्या खराब रस्त्यावरून जावे लागले. जेटीकडे जाणार्‍या निसर्गरम्य रस्त्याची प्रतीक्षा संपणार तरी कधी?

तीन महिन्यांपूर्वी पूर्ण झालेल्या रस्त्यावर तटरक्षक दलाचा कंटेनर असल्याने रस्ता खुला करण्यास अडचणी येत होत्या. ग्रामस्थांनी तटरक्षक दलाच्या अधिकार्‍यांकडे तक्रार केल्यावर तो कंटेनर काढण्यात आला. आता जेटीकडे जाणार्‍या रस्त्याला जोडण्याचे एक दिवसाचे काम बाकी आहे. ते पूर्ण करून रस्ता पर्यटकांसासाठी खुला करावा, अशी पर्यटकांची मागणी आहे.

या रस्त्याचा परिसर अतिशय सुंदर आहे. समुद्राच्या लाटांचा आनंद घेत, समोर जंजिरा किल्ला, दिघी पोर्टची भव्य जेटी, आगरदांडा खाडीत सीगल पक्ष्यांचे थवे पाहात आपण जेटीवर पोहोचतो. अशा निसर्गरम्य रस्त्याचा आनंद घेण्याची प्रतीक्षा संपणार कधी, अशी विचारणा नागरिकांमधून होत आहे. याबाबत संबंधित अधिकारी वर्गाने तातडीने निर्णय घेण्याची गरज आहे.

Exit mobile version