स्थानिक शेतकऱ्यांचा कामाला विरोध; मोजणी करून मोबदला देण्याची मागणी
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम खात्याकडून रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण काम सुरु आहे. या रस्त्याचे भूसंपादन शासनाने केलेले नाही आणि त्यामुळे आमचा रस्त्याच्या कामाला विरोध आहे. आमच्या शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्या आणि खुशाल रस्त्याचे काम सुरु करा, असे आव्हान येथील शेतकऱ्यांनी केले आहे. दरम्यान, रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यासाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात वाहनचालक यांचा प्रवास खड्ड्यातून सुरु आहे.
नेरळ-कळंब रस्त्याच्या रुंदीकरण व काँक्रीटीकरणाचे काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एमएसआयडीसीकडून सुरु आहे. मात्र, रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त जागेचे भूसंपादन न करताच शेतकऱ्यांच्या जमिनीचा वापर केला जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, या अन्यायाविरोधात आगरी समाज संघटनेकडे पत्र देऊन संघटने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागेची शेतकऱ्यांच्या उपस्थितीत योग्य पद्धतीने मोजणी करून, कायदेशीर भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करावी आणि त्यानंतरच रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी संबंधित विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मात्र, संबंधित अधिकाऱ्यांकडून या निवेदनाची दखल घेतली जात नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर रस्त्याचे रुंदीकरण सुरु आहे. मात्र, या रस्त्यासाठी जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाने मोबदला दिलेला नाही. त्याबाबत आगरी समाज संघटनेने बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंता यांच्याशी बोलून मार्ग काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी पत्राद्वारे केली आहे. रस्त्यासाठी जमीन शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे आर्थिक मोबदला द्यावा आणि एकदा कामे करून गेले की कोणी तिकडे लक्ष देत नाही. 2017 मध्ये रस्त्याचे रुंदीकरण करताना भुसंपादनाचा प्रस्ताव करून तुम्हाला मोबदला देऊ, असे आश्वासन मिळाले होते. मात्र, शासनाने अद्याप कोणताही मोबदला दिला नाही. रस्ता हा 3.70 मीटर लांबीचा होता आणि तो साडे पाच मीटरचा बनविला जात आहे. त्यामुळे आम्हला शासनाने मोबदला द्यावा आणि खुशाल रस्त्याचे काम करावे, असे विनंती केली आहे. तर आम्ही शासनाला कोणत्याही कामाला विरोध करीत नाही आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला देऊन रस्त्याचे अर्धवट काम पूर्ण करावे, अशी सूचना शेतकरी सूर्यकांत चंचे यांनी केली आहे.
वाहनचालक त्रस्त
रस्त्याचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरण करण्यासाठी खोदकाम करण्यात आले. त्या खोदकामामुळे आणखी खड्डे पडले आहेत. परिणामी रस्त्यावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.
