पावसाळ्यात रस्त्याची होणार धूळधाण

| उरण | वार्ताहर |

पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने खोपटा-कोप्रोली व दिघोडे-चिर्ले रस्त्याच्या डांबरीकरणाचे किंवा खड्डे दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात सदर रस्त्याची धूळधाण होणार आहे, अशी भीती प्रवासी नागरिक व्यक्त करत आहेत.

उरण तालुक्यातील ग्रामीण भागातील खेड्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग म्हणून खोपटा-कोप्रोली आणि दिघोडे-चिर्ले या रस्त्यांकडे पाहिले जाते. या रस्त्यावरुन तालुक्याच्या ठिकाणी किंवा मुंबई शहराच्या दिशेने जाणारे हजारो चाकरमानी, नोकरदार, विद्यार्थी, प्रवासी नागरिक तसेच लहान-मोठी वाहने वापर करत आहेत. त्यामुळे खोपटा-कोप्रोली रस्त्याच्या डांबरीकरणासाठी एनएचएमआय कार्यालयाकडून सुमारे 3 कोटी 75 लाखांचा निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि खासगी कंटेनर यार्ड, गोदाम व्यवस्थापकांकडून जवळजवळ दोन ते तीन कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. तसेच दिघोडे-चिर्ले या रस्त्यांसाठी सुमारे एक कोटींच्या वर निधी खर्च करण्यात आलेला आहे.

मात्र, संबंधित कार्यालयातील भ्रष्ट कारभारामुळे खर्च करण्यात आलेला निधी वाया गेला आहे. असे चित्र रस्त्यावरुन मार्गक्रमण करत असताना निदर्शनास येत आहे. पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने खोपटा-कोप्रोली व दिघोडे-चिर्ले रस्त्याच्या डांबरीकरणाचे किंवा रस्ता दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात सदर रस्त्याची धूळधाण होणार आहे, अशी भीती प्रवासी नागरिक व्यक्त करत आहेत.

Exit mobile version