सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण
| उरण | वार्ताहर |
कोप्रोली नाका ते खोपटा पूल व दिघोडे नाका ते चिर्ले या रस्त्यावर सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे सकाळ, संध्याकाळी याचा त्रास नोकरदार, विद्यार्थी, रुग्णांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे रस्त्यावरुन मार्गक्रमण करणारे नागरिक आणि वाहनचालक पुरते वैतागले आहेत. तरी उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम, उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकार्यांनी यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
उरण तहसील, उरण पंचायत समिती या कार्यालयांच्या अधिकारी वर्गाने उरणवासियांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे रोज सकाळी आणि सायंकाळी कोप्रोली नाका ते खोपटा पूल आणि दिघोडे नाका ते चिर्ले या महत्त्वाच्या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. अवजड वाहनांसह येथे चारचाकी वाहनांच्या मोठ्या रांगा लागत आहेत. त्यामुळे आबालवृद्धांबरोबर महिलांना रस्ता ओंलाडणेही कठीण बनले असून, दररोजची वाहतूक कोंडी लोकांसाठी डोकेदुखी बनली. तरी तहसीलदार डॉ. उद्धव कदम, गटविकास अधिकार्यांनी यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
वाहतूक कोंडीचे कारणे
रस्त्यावर वाढते अतिक्रमण, हातगाडी, भाजी विक्रेते, मच्छी विक्रेते यांनी घेतलेला रस्त्याचा ताबा, रस्त्यावर रिक्षा थांबे, बेशिस्त वाहन चालक, रस्त्यांना पडलेले खड्डे, बेशिस्त वाहन पार्किंग, विरुद्ध दिशेने प्रवास करणारे वाहन चालक.