बांधकाम विभागाने घेतली कृषीवलची दखल
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायत मधील बार्डी गावातील स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्याचे काम मंजूर झाले होते. त्यातील 290 मीटर लांबीचा रस्ता काँक्रीटचा बनविण्यात आला होता. मात्र, हा रस्ता जेथून बनविला जाणार होता, तेथून बनविण्यात आला नव्हता. त्यामुळे साधारण 20 मीटर लांबीचा रस्ता अपूर्ण ठेवण्यात आल्याची दखल ‘कृषीवल’ने घेतली होती. दरम्यान, संबंधित ठेकेदाराने याची दखल घेत अपुर्णावस्थेतील 20 मीटर लांबीचा रस्ता काँक्रीटीकरण करून दिला आहे.
कर्जत तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायती मधील बार्डी गावातील स्मशानभूमीकडे जाणार्या रस्त्यासाठी 18 लाखांचा निधी मंजूर झाला होता. मात्र, हा रस्ता ज्या ठिकाणी सुरु होतो तेथून रस्ता न बनविता काही अंतर सोडून तयार करण्यात आल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत होती. मात्र, याबाबत ठेकेदाराला विचारले असता, 290 मीटरचा रस्ता बनविण्यासाठी जेवढा निधी मंजूर झाला होता तेवढा लांबीचा रस्ता बनविला आहे, असे सांगीतले. मात्र, रस्त्याचे काम ज्या ठिकाणावरून सुरु करण्याचे अंदाजपत्रकात नमूद केले आहे, तेथून हा रस्ता बनविण्यात आला नसल्याने संबंधित ठेकेदारावर रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.
या अपूर्णावस्थेत ठेवण्यात आलेल्या रस्त्याबाबत ‘कृषीवल’ने आवाज उठवल्यावर रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद बांधकाम विभागाने ठेकेदाराला सूचना केल्या. त्यानुसार ज्या ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण अवस्थेत ठेवण्यात आले होते, तेथे काँक्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी रस्त्याचे काम पूर्ण झाल्याबद्दल बांधकाम विभागाचे तसेच ‘कृषीवल’चे आभार मानले आहेत.







