दोन वर्षे रखडलेल्या रस्त्याचे काम सुरू

नेरळ । प्रतिनिधी ।
माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावरील 200 मीटर लांबीच्या सिमेंट काँक्रीटीकरण रस्त्याचे काम चार वर्षे रखडले होते. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाने स्थानिकांची गरज लक्षात घेऊन रस्त्याचे काम सुरु केले आहे. दरम्यान, या रस्त्याच्या कामासाठी थेट राज्याचे मुख्यमंत्री यांच्या पोर्टल वर तक्रारी केल्या होत्या.
माथेरान-नेरळ-कळंब या राज्यमार्ग रस्त्यावर नेरळ येथील युवराज सोसायटी पासून साई मंदिर नाका या भागात असलेला 200 मीटर लांबीचा रास्ता हा सिमेंट काँक्रीटचा बनवला जाणार होता. मात्र कळंब पासून नेरळ येथील रेल्वे फाटक या दरम्यान रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराने रस्त्याचे काँक्रीटीकरण न करताच तो रस्ता सोडून दिला होता. त्यामुळे या भागातील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी मुख्यमंत्री पोर्टल वर तक्रार करून रस्त्याच्या अन्य भागात केलेल्या डांबरीकरण आणि रखडलेल्या काँक्रीटीकरण कामाबद्दल तक्रार केली होती.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम अर्धवट ठेवणार्‍या ठेकेदार कंपनीला काळ्या यादीत टाकले होते. मागील वर्षी नवीन ठेकेदार नेमण्यात आला, परंतु तरीदेखील त्या भागातील काँक्रीटच्या रस्त्याचे काम अपूर्णच राहिले होते. त्यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याने त्या भागात रस्त्यावरील खड्डे मातीने भरले आणि स्थानिकांना मातीमुळे आणि रस्त्यावरील वाहनांच्या वर्दळीमुळे श्‍वसनाचे त्रास जाणवू लागले होते.
हे लक्षात घेऊन स्थानिक पातळीवर लोकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असंख्य तक्रारी केल्या. त्यामुळे बांधकाम विभागाने निविदा काढून 200 मीटर लांबीचा रस्ता काँक्रीटीकरण करण्यास सुरुवात केली आहे. युवराज सोसायटीच्या हुतात्मा हिराजी पाटील नगर येथून रस्त्यावर साई मंदिर नका अशा भागातील रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण कामाला सुरुवात केली आहे. सलग 200 मीटर लांबपर्यंत रस्त्यावर काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. ते पूर्ण झाल्यावर दुसर्‍या बाजूचा रस्ता काँक्रिटीकरण केला जाणार आहे. त्यामुले आगामी काही दिवसात नेरळ-रेल्वे फाटक ते साई मंदिर रस्त्यावर काँक्रीटच्य रस्त्यावरून लोकांना प्रवास करता येणार आहे.

Exit mobile version