शेकापच्या रास्ता रोकोने रस्त्याचे काम मार्गी

शनिवारपासून दुरुस्तीला करणार सुरुवात
सार्वजनिक बांधकाम विभागासह कंत्राटदाराची माहिती
रस्त्याच्या कामात आडवे येणार्‍याला शेकाप आडवा करेल

आ. जयंत पाटील यांचा इशारा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
आपण पाठपुरावा करीत मंजुरी मिळालेल्या रस्त्याच्या कामात ठेकेदाराकडून टक्केवारी मागितली जात असल्याने हे काम रखडले होते. मात्र ठेकेदाराने कोणाच्याही धमकीला भिक न घालता रस्त्याचे काम सुरु करावे या कामात जो कोणी आडवा येईल त्याला आडवा करण्याचे काम शेकापक्ष करेल असा शब्द शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी दिला.

अलिबाग-रोहा रस्त्यासाठी आज शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत पुरोगामी युवक संघटनेमार्फत रास्ता रोको आंदोलन खानाव नाका येथे करण्यात आले. शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांनी केले. जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता हे रस्त्याबाबत आश्‍वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. या आंदोलनादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदरे यांनी सामोरे जात रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात येण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले. लवकरच ठेकेदाराकडून रस्त्याचे काम सुरू होणार असल्याने प्रवाशांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

अलिबाग-रोहा रस्ता गेली अनेक वर्षे हा खड्डेमय आहे. शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी या रस्त्यासाठी पुढाकार घेऊन तो तत्कालीन बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून मंजूर केले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत रस्त्याच्या कामाचे राजकारण करुन तत्कालिन सरकारने निविदा अडवल्याने शेकापचा पराभव झाला. त्यादरम्यान निवडून आलेल्यांनी वल्गना करीत 25 तारखेपासून त्वरित रस्त्याचे काम स्वखर्चाने सुरू करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र अडीच वर्षे होऊनही काम अपूर्णच आहे. त्यामुळे आज जनतेच्या हितासाठी शेकापतर्फे या रस्त्यासाठी रस्ता रोको आंदोलन केले गेले. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी हे रस्त्याबाबत ठोस आश्‍वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा पावित्रा शेकाप कार्यकर्त्यांनी घेतला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांनी आणि ठेकेदारांनी दोन दिवसांत रस्त्यावर पडलेले खड्डे भरून देणार असून वर्षभरात तीन लेअर रस्ता सुडकोली पर्यंत पूर्ण करणार असल्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संजय पाटील, पुरोगामी युवक संघटनेच्या अध्यक्षा साम्या कोरडे, तालुका चिटणीस अनिल पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रमोद ठाकूर, प्रमोद पाटील, माजी उपसभापती संदीप घरत, अ‍ॅड मनोज धुमाळ, पुरोगामी युवक संघटनेचे तालुका अध्यक्ष विक्रांत वार्डे, युवराज पाटील, नगरसेवक, सरपंच, सदस्य यासह शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळे दोन तास वाहतुकीचा खेळखंडोबा झाला होता.


स्वतः खर्च करुन रस्ता बनविणारा अजून जन्मायचाय
निवडून आल्यानंतर दुसर्‍या दिवसापासून स्वखर्चाने रस्त्याचे काम सुरू करण्याच्या वल्गना करणार्‍यांची खिल्ली उडवताना आ. जयंत पाटील म्हणाले की, मी एक वर्षे काही न बोलता रस्त्याचे काम होण्याची वाट बघत होतो. मात्र अडीच वर्षे झाले तरी रस्ता अजूनही या रस्त्याचे काम टक्केवारीमुळे रखडलेलेच आहे. संपूर्ण हिंदुस्तानात स्वतः पैसे खर्च करून रस्ता बनविणारा अजून जन्माला आलेला नाही असा सणसणीत टोला जयंत पाटील यांनी कोणाचेही नाव न घेता लगावला आहे.

दोन तास रस्ता रोखला
शेकाप महिला आघाडी प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली शेकापक्ष पुरस्कृत पुरोगामी युवक संघटनेच्या वतीने खानाव नाका येथे रास्ता रोको पुकारत सकाळी 9.30 वाजल्यापासून प्रत्यक्ष रास्ता रोको आंदोलना सुरुवात केली. या आंदोलना दरम्यान लोकशाही मार्गाने लढा देत भाषण देत आणि गाण्यातून शेकाप नेत्यांची महती गात असल्याने प्रशासनावर देखील कोणत्याही प्रकारचा तणाव आला नाही. 11.30 वाजेपर्यंत तब्बल दोन तास हे आंदोलन सुरु होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुखदरे यांनी ठेकेदाराचे प्रतिनिधीसह सामोरे जात रस्त्याचे काम लवकर सुरू करण्यात येण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Exit mobile version