माथेरान मधील रस्त्याची कामे सुरू

। माथेरान । प्रतिनिधी ।
मागील पंधरा दिवसांपासून सर्वत्रच मोठया प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत आहे माथेरान उंचावर असल्याने इथे पावसाचे प्रमाण सर्वाधिक असते.जिल्हानिहाय पर्जन्यनोंदी मध्ये माथेरान अव्वल असून इथे पर्जन्यवृष्टीने तीन हजार मि.मी.चा टप्पा पार केला आहे.त्यामुळे साहजिकच रस्त्याची सुध्दा मोठया प्रमाणावर धूप झालेली दिसत आहे. तर काही ठिकाणी मोठं मोठे लाकडाचे ओंडके पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात पाण्याचा निचरा होणार्‍या मोर्यांच्या तोंडाशी अडकल्यामुळे पाणी रस्त्यावरून वहात होते.घाटरस्त्यात सुध्दा अशाचप्रकारे काही भागात झाडे उन्मळून पडली आहेत.मुख्य पॉईंट्स कडे जाणार्‍या रस्त्यावर ज्या ज्या ठिकाणी रस्त्यांची वाताहत झाली आहे अशा जागी नगरपरिषदेच्या माध्यमातून रस्त्याच्या दुरुस्तीसाठी युद्धपातळीवर कामे पूर्ण केली जात आहेत. त्याबाबत नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, गटनेते प्रसाद सावंत,मुख्याधिकारी प्रशांत जाधव,यांनी संबंधीत अधिकारी वर्गाला सूचना केल्या असून त्याचे तंतोतंत पालन केले जात आहे.

माथेरान नगरपरिषद माथेरानच्या पायाभूत सुविधा देण्यासाठी कटीबद्ध आहे. आणि त्याप्रमाणे तीव्र उताराचे रस्त्यांची मातीधुप यापुढे होऊ नये म्हणून प्राधान्यतेने त्यांची विकासात्मक कामे सुरू आहेत. यानुषंगाने यापूर्वी प्रलंबित असलेली रस्ते, गटारे, मोर्‍यांची कामे सध्या माथेरानला चालू आहेत. माथेरान हे पण आपले घरच असल्याने या पायाभूत सुविधांचे काम पूर्ण होईपर्यंत तशीच श्रद्धा व सबुरी व समंजसपणा माथेरानकरांनी दाखवायला हवा.सर्व काही कामे लवकरच पूर्ण केली जात आहेत.
नितीन सावंत –वन समिती सदस्य माथेरान

Exit mobile version