| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये देखरेखीअभावी एमएमआरडीएची कामे चुकीच्या पद्धतीने होत असल्याबद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
माथेरान सारख्या दुर्गम अशा पर्यटनस्थळाला राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून 123 कोटी रुपयांचा भरीव निधी प्राप्त झाल्यामुळे इथली विकास कामे एमएमआरडीए मार्फत मार्गावर दिसत आहेत. परंतु होत असणार्या कामांवर कुणाचाही अंकुश अथवा देखरेख नसल्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने अन घाईगडबडीत सर्व ठिकाणी कामे सुरू आहेत त्यामुळे ही कामे फारकाळ तग धरू शकणार नाहीत हे स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे स्थानिकांमधून नाराजीचे सूर अप्रत्यक्षपणे व्यक्त होताना दिसत आहेत.
एवढया मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध झालेला असताना तो खर्च करतांना प्रामुख्याने नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाने कुठल्याही प्रकारे लक्ष केंद्रित केलेले नाही की होणारी कामे कशाप्रकारे पूर्ण होत आहेत याबाबत गांभीर्याने घेतलेले नाही त्यामुळेच ही कामे जास्त काळ टिकू शकणार नाहीत. रस्त्यावर लावण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक हे चांगल्या दर्जाचे आहेत किंवा कसे याबाबत सुध्दा इथल्या तज्ञ,अतिहुशार राजकारणी मंडळींनी सुध्दा काहीएक स्वारस्य दाखविलेले नाही.
निविदेच्या कामातील क्वांटीटी पूर्ण करण्यासाठी अनावश्यक ठिकाणी सुध्दा गॅबियन वॉल बांधण्यात आलेल्या आहेत तर इथे मोठया प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असते याची कल्पना असताना सुध्दा पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाळी पाणी रस्त्यावरून वाहत होते. याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेले कठडे तोडून पाणी जायला मार्ग मोकळा केला गेला आहे. त्यातही जिथे उताराची जागा आहे त्याठिकाणी जागा न करता चढावाच्या ठिकाणी कठडे तोडण्यात आलेले आहेत त्यामुळे आगामी काळात रस्त्याचे क्ले पेव्हर ब्लॉक हे हळूहळू निखळून जाणार आहेत.