| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील शासकीय कार्यालयातील सर्व्हर व्यवस्थित चालत नसल्यामुळे नागरिकांना सर्व प्रकारचे दाखले वेळेत मिळत नाहीत. या गंभीर समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पोलीस मित्र संघटनेचे रमेश कदम यांनी साखळी उपोषण सुरु केले होते. अखेर या उपोषणाला यश आले असून, बहुसंख्य मागण्या मान्य झाल्या आहेत.
तालुक्यातील हजारो विद्यार्थी व नागरिकांना सर्वर व्यवस्थित चालत नसल्यामुळे सर्व प्रकारचे दाखले वेळेत मिळत नाहीत. त्यामुळे शासनाने आणि प्रशासनाने सर्व प्रकारचे दाखले ऑफलाईन देण्याची व्यवस्था करावी. उत्पन्न दाखले दाखल केलेल्या पावतीवर सर्व विद्यालयात विद्यार्थ्यांना प्रवेश देऊन ते दाखल करण्यास 2 महिन्यांचा कालावधी द्यावा. या मागण्यांसाठी दि.22 मेपासून कर्जत प्रशासकीय भवनाबाहेर साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते. त्यानंतर सोमवार दि.25 मेपासून तहसील कार्यालयाने आपल्या सेतू कार्यालयातून सर्व शासकीय दाखले देण्यास सुरुवात केली. त्यावेळी तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी सेतू कार्यालयाला दिवसाची रात्र करून सर्व प्रलंबित दाखले देण्याची कार्यवाही व्हावी, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर मंगळवारी (दि.26) कर्जत गटविकास अधिकारी सुशांत पाटील, गट शिक्षण अधिकारी अनंत खैरे यांनी उपोषण स्थळी भेट दिली. यावेळी शिक्षण विभागातील सर्व मागण्या मान्य करीत लेखी निवेदने दिल्याने हे साखळी उपोषण स्थगित करण्यात आले आहे.







