रस्त्याची कामे वाहतुकीस अडथळा

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी हाती घेतलेल्या खारघर आणि कळंबोली शहराच्या प्रवेशद्वाराजवळच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम वाहतुकीस अडथळा ठरत आहे. विशेष म्हणजे, पावसाळ्यापूर्वी ही कामे मार्गी न लागल्यास थेट सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक यामुळे विस्कळीत होऊ शकते.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर आणि कळंबोली ही मुख्य शहरे आहेत. दररोज मोठ्या प्रमाणात वाहने याठिकाणाहून ये-जा करतात. पावसाळ्यात या मार्गावर पडणारे खड्डे लक्षात घेता पालिकेने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी हे रस्ते काँक्रिटचे करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे, कळंबोली शहरातील अंतर्गत रस्तेदेखील काँक्रिटीकणासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम केले आहे. मात्र, हे काम हाती घेण्याचे टायमिंग कुठे तरी चुकले असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत.

पावसाळा आणि वाहतूक कोंडी, रस्त्यावरील खड्डे हे समीकरण जुने आहे. त्यामुळे जर का पावसाळ्यापूर्वी हे काँक्रिटचे काम मार्गी न लागल्यास शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होईल. खारघरमध्ये याची प्रचिती हिरानंदानी येथून जाणाऱ्या वाहन चालकांना येत आहे. त्यामुळे पावसाळ्याला काही दिवस शिल्लक असताना हे काम पूर्ण करण्याचे शिवधनुष्य पालिकेला पेलावे लागणार आहे.

Exit mobile version