उपोषणाला वाढता पाठिंबा
| पनवेल ग्रामीण | प्रतिनिधी |
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी चिंचपाडा येथे आमरण उपोषण करणाऱ्या रश्मिता पोपेटा यांच्या आंदोलनाला दिवसेंदिवस व्यापक पाठिंबा मिळत आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी रात्री भ्रमणध्वनीवरून रश्मिताशी संवाद साधत तिच्या प्रकृतीची विचारपूस केली. राज्य सरकार या मागणीबाबत सकारात्मक असून, प्रस्ताव केंद्र सरकारकडे प्रलंबित असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत आंदोलनाच्या भावना पोहोचविण्याचे आश्वासन दिले. तसेच प्रकृतीची काळजी घेण्याचाही सल्ला दिला.
दरम्यान, उपोषणाच्या चौथ्या दिवशी रश्मिता पोपेटा यांची प्रकृती खालावल्याने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शनिवारी सकाळी 11 वाजता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणारे सर्व मार्ग रोखून रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असून विविध राजकीय पक्ष, स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त, आगरी, कोळी, कराडी, भोई, बारा बलुतेदार आणि ओबीसी समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
या आंदोलनाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षानेही अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे उपनेते बबनदादा पाटील यांनी रश्मिता पोपेटा यांना लेखी पाठिंबा देत नामकरणाचा प्रस्ताव अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आंदोलनात खासदार बाळ्यामामा म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, मनोहरशेठ भोईर, महेंद्र घरत, प्रसाद भोईर, दीपक निकम, संदेश ठाकूर यांच्यासह विविध पक्षांचे नेते व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
