ढवर येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ

गावाच्या विकासाला मिळणार नवी गती; चित्रलेखा पाटील यांचे विशेष प्रयत्न

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील ढवर येथे शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्त्या तथा नेत्या चित्रलेखा पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि ग्रामस्थांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे याठिकाणी डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ रविवारी (दि.8) चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

मतदारसंघातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास साधताना रस्ते, पाणीपुरवठा, वीज, अंतर्गत रस्ते तसेच सार्वजनिक सुविधांसारख्या मूलभूत विकासकामांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न चित्रलेखा पाटील यांच्याकडून सातत्याने केला जात आहे. गावागावांतील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्यांच्या मागण्यांनुसार आवश्यक विकासकामांसाठी संबंधित स्तरावर पाठपुरावा केला जात आहे. ग्रामीण भागातील रस्ते हे विकासाचे महत्त्वाचे माध्यम असून, चांगल्या दर्जाच्या रस्त्यांमुळे नागरिकांची दळणवळणाची सुविधा सुलभ होण्यासोबतच विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि वाहनचालकांना मोठा दिलासा मिळतो.

त्यामुळे याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून ढवर गावातील मुख्य डांबरी रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी, ढवर गावातील आजवर झालेली अनेक विकासकामे शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातूनच मार्गी लागली असल्याची भावना व्यक्त केली. गावाच्या विकासासाठी शेकापने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली असून, यापुढेही गाव शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी पूर्वीप्रमाणेच ठामपणे उभा राहील, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. ग्रामस्थांच्या एकजुटीला लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नांची जोड मिळाल्यास विकासकामे निश्चितपणे मार्गी लागतात, हे या कामाच्या शुभारंभातून पुन्हा अधोरेखित झाले.
ग्रामस्थांच्या अपेक्षा, लोकसहभाग आणि विकासाचा ध्यास यांची सांगड घालत ढवर गावाच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल पडले असून, आगामी काळातही मतदारसंघातील विविध प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचा निर्धार यावेळी चित्रलेखा पाटील यांच्या मार्फत व्यक्त करण्यात आला.

Exit mobile version