| पनवेल | वार्ताहर |
लघुशंका करण्यासाठी गेलेल्या वाहन चालकाला लुटल्याप्रकरणी चार अनोळखी इसमांविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
जितलाल महतो हा वावोशी, खालापूर येथे राहात असून, हायवा डंपर क्रमांक एम.एच. 46 एफ 3740 वर चालक म्हणून काम करतो. मालक इमरान खान याच्या सांगण्यावरून कोळसा भरण्याकरिता करंजा पोर्ट, उरण येथे तो गेला होता. त्यानंतर डंपरमध्ये कोळसा भरला आणि कोळसा वावोशी खालापूर येथे घेऊन जात असताना पहाटे साडेतीनच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे वरती पळस्पे हायवे ट्रॅफिक चौकीच्या थोडे पुढे जाऊन डंपर थांबून टायरमधील हवा चेक केली आणि लघुशंका करत असताना डंपरच्या पाठीमागून एक इसम आला. त्यावेळी त्याला काय झाले असे विचारले असता त्याने महतो याला हाताबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तीन इसम त्या ठिकाणी आले आणि त्यांनीदेखील मारहाण करून महतो याच्या खिशातील मोबाईल, ब्लूटूथ हेडफोन आणि रोख रक्कम हिसकावून घेऊन ते पळून गेले. चारही इसम 20 ते 25 वयोगटातील होते. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.