एकूण 46 हजाराचा ऐवज लंपास
| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील रेवदंडा येथील आगरआळीतील एका घरात चोरट्याने दरोडा टाकल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी या घरात एकट्याच राहणाऱ्या वयोवृध्द महिलेला जखमी करून सोन्याच्या दागीन्यांसह रोकड लंपास केली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना मंगळवारी (दि.23) रात्रीच्या सुमारास घडली असून चोट्यांनी रेवदंडा पोलीसांना खुले आव्हान केले आहे. हे आव्हान पेलण्यास पोलीस यशस्वी ठरतील का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.
रेवदंडा येथील आगरआळीतील सुनंदा राऊत असे या वयोवृध्द महिलेचे नाव आहे. या महिलेचा मुलगा ठाणे येथे नोकरी, व्यवसानिमित्त राहत असल्यामुळे येथील घरात त्या एकट्याच राहत आहेत. या संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला. मंगळवारी रात्री महिला हॉलमध्ये लादी पुसत असताना मागच्या दारातून दोघेजणे घरात घुसले. त्यांनी वयोवृध्द महिलेचे तोंड दाबून खेचत खोलीमध्ये नेत ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील व कानातील सोन्याचे दागीने जबरदस्ती खेचून काढले. तसेच, देवाऱ्यात ठेवलेली रोकडदेखील घेतली. असा एकूण 46 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
याप्रकरणी रेवदंडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले करीत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथक तयार करण्यात आले आहे. वेगवेगळ्या माध्यमातून चोरटयांचा शोध पोलीसांनी घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचीदेखील मदत घेण्यात आली आहे.