रोबोटने मोडला बोल्टचा विक्रम

| बीजिंग | वृत्तसंस्था |

चिनी कंपनी ‌‘तियानझुओ‌’ किंवा बीजिंग ह्युमनॉइड रोबोट इनोव्हेशन सेंटरने विकसित केलेल्या ह्युमनॉइड रोबोटने 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत मानवी जागतिक विक्रम मोडला आहे. दुसऱ्या ‌‘वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्स‌’च्या प्राथमिक फेरीत या रोबोटने अवघ्या 9.39 सेकंदात 100 मीटरची शर्यत पूर्ण करून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. ही वेळ जमैकाचा महान धावपटू उसेन बोल्टच्या 9.58 सेकंदांच्या विक्रमापेक्षा अधिक वेगवान आहे.

बीजिंगच्या ‌‘आइस रिबन‌’ स्टेडियमवर शनिवारी (दि.22) संध्याकाळी झालेल्या प्राथमिक शर्यतीत तीन ह्युमनॉइड रोबोट्सनी भाग घेतला होता. शर्यत सुरू होण्याचा संकेत मिळताच तिन्ही रोबोट्स वेगाने पुढे सरकले. सीसीटीव्ही न्यूजच्या फुटेजमध्ये तियानझुओ टीम आणि ‌‘विंड-फायर लाइटनिंग‌’ टीमचे रोबोट्स सुरुवातीपासूनच एकमेकांच्या अगदी जवळ धावताना दिसले. शर्यत पुढे सरकत असताना त्यांच्या पावलांचा वेग वाढला आणि हात अधिक जोरात मागे-पुढे हालू लागले. अखेरीस तियानझुओ टीमच्या रोबोटने एका रोबोटच्या लांबीइतके अंतर राखून अंतिम रेषा ओलांडली आणि 9.39 सेकंदात शर्यत पूर्ण केली. तर, दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या लाइटनिंग रोबोटने 9.47 सेकंदात फिनिश लाइन ओलांडली, जी बोल्टच्या विक्रमापेक्षा चांगली आहे. या कामगिरीमुळे गेल्या वर्षीच्या ‌‘वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्स‌’मधील 21.50 सेकंदांचा सर्वोत्तम विक्रमही मोडला गेला आहे. मात्र, रोबोटच्या या कामगिरीमुळे मानवाचा अधिकृत जागतिक विक्रम बदलत नाही. ही कामगिरी ह्युमनॉइड रोबोट्ससाठीच्या स्वतंत्र श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे.

Exit mobile version