। महाड । प्रतिनिधी ।
हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाच्या पायरी मार्गावर महादरवाजा ते मदार मोर्चा दरम्यान दगड कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून हा मार्ग तात्पुरता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असल्याची माहिती महाड तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
पायरी मार्गावर आलेले दगड हटविण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत तातडीने हाती घेण्यात आले आहे. मात्र, काम पूर्ण होण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता शिवभक्तांनी सद्यस्थितीत या मार्गावरून प्रवास करू नये, असे आवाहन बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, येत्या शनिवारी (दि. 27) तिथीनुसार किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा 353 वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने शिवभक्त रायगडावर दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने अधिक खबरदारी घ्यावी, अशी अपेक्षा शिवभक्त व स्थानिक ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.






