| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टी-20 विश्वचषक 2022 मधील भारतीय संघाचा प्रवास खूपच नेत्रदीपक राहिला आहे. भारताने पाकिस्तान आणि नेदरलँड्ससोबतच्या सामन्यात शानदार विजय मिळवले आहेत. दोन विजयांसह संघाने गटात अव्वल स्थान पटकावले आहे. या दोन्ही विजयांमध्ये एक गोष्ट समान आहे आणि ती म्हणजे किंग कोहलीची जबरदस्त कामगिरी. दोन्ही सामन्यात अपराजित राहताना त्याने संघाला विजयापर्यंत नेले. अशा स्थितीत बीसीसीआयचे नवे अध्यक्ष बनलेल्या रॉजर बिन्नी यांनी विराट कोहलीचे खूप कौतुक केले आहे.
बीसीसीआयचे नवे अध्यक्ष बनलेल्या रॉजर बिन्नी यांनी विराट कोहलीचे कौतुक करताना त्याच्या या खेळीचे स्वप्नवत वर्णन करत त्याचे जोरदार कौतुक केले. पाकिस्तानी संघाच्या जबड्यातून विजय हिसकावून घेणार्या कोहलीचे बीसीसीआय अध्यक्षांनी स्तुती केली. ते शुक्रवारी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) येथे त्यांच्या सत्कार समारंभात बोलत होते.
विराटचा पाकविरुद्धचा खेळ माझ्यासाठी स्वप्नासारखा होता. कोहलीने ज्या पद्धतीने चेंडू सीमापार पाठवले, ते अविश्वसनीय होते. तो दणदणीत विजय होता. आम्ही असे बरेच सामने पाहिले नाहीत, जेव्हा बहुतेक वेळा पाकिस्तान भारतावर दबाव आणत असल्याचे दिसते. परंतु भारताने अचानक पुनरागमन केले आणि सामना जिंकला.
रॉजर बिन्नी
बीसीसीआय अध्यक्ष
रॉजर बिन्नी यांनी पाकिस्तानविरुद्धच्या शानदार खेळीचे कौतुक करताना कोहलीशी संबंधित प्रश्नाला उत्तर देताना, कोहली महान खेळाडू असल्याचे सांगून त्याच्या कामगिरीबाबतही मोठे वक्तव्य केले आहे. स्वत:ला सिद्ध करण्याच्या कोहलीच्या प्रश्नाला उत्तर देताना बिन्नी यांनी महत्वाचे वक्तव्य केले.
बिन्नी म्हणाले, कोहलीला काहीही सिद्ध करण्याची गरज नाही. तो जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि त्याच्यासारखा खेळाडू दबावातही चांगली कामगिरी करतो. जेव्हा तुम्ही सामना हरता, तेव्हा तुम्ही हार न मानता भारताने ज्या प्रकारे सामना खेळला त्याबद्दल तुम्हाला आनंद व्हायला हवा.
पाकिस्तान आणि झिम्बाब्वे संघात झालेल्या सामन्यात, झिम्बाब्वेने बलाढ्य पाकिस्तानला एका धावेने पराभूत केले. त्यामुळे पाकिस्तान संघाला उपांत्य फेरीमध्ये पोहचण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर बोलताना बिन्नी म्हणाले की, कोणत्याही संघाला कधीच कमी लेखू नये. ज्युनियर संघ येत आहेत हे चांगले आहे. या टी-20 विश्वचषकात झिम्बाब्वे आणि आयर्लंडने हे सिद्ध केले आहे. आता तुम्ही छोट्या संघांना हलक्यात घेऊ शकत नाही. ते तुम्हाला सहज हरवू शकतात. मला वाटते की, आता पाकिस्तानसाठी (उपांत्य फेरी) प्रवेश करणे कठीण होईल.