रोहा आगाराचा ग्रामीण प्रवाशांकडे दुलक्ष

। कोलाड । वार्ताहर ।
गेल्या अनेक वर्षापासून रोहा आगरातून रोहा (ताम्हाणी मार्गे) स्वारगेट ही एस. टी. महामंडळाची गाड़ी सकाळी 6 वाजता सुटते. अगदी सुरुवाती पासूनच या गाडीला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. ही गाडी रोहा आगारातून सुटल्यानंतर कोलाड सुतारवाडी विळे – मार्गे स्वारगेटकडे रवाना होते. पूर्वी सुतारवाडी येथून पुणेकडे जाण्यासाठी प्रवाशांना कोलाड वाहतूक नियंत्रकाकडून रिझर्वेशन मिळायचे आता मात्र तो बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सुतारवाडीसह सोळा वाड्यांतील प्रवाशांना पुणेकडे जाण्यासाठी दोन ते अडीच तास उभ्याने प्रवास करावा लागत असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

कोलाड येथील वाहतूक नियंत्रक कक्षात आरक्षण मिळत नसल्यामुळे आरक्षण करण्यासाठी पंचवीस ते तीस किमी प्रवासकरुन रोहा येथे जावे लागत आहे. हा मोठा भुर्दंड तर आहेच परतील रोहा येथे सुतारवाडी – पौड स्टँड अशा प्रवासाचे आरक्षण करायला गेल्यानंतर कोलाड ते चांदणी चौक असे सक्तीने आरक्षण प्रवाशांच्या माथी मारले जाते. ज्या ठिकाणी 120 रु. लागतात त्या ठिकाणी 165 रु. भरावे लागत आहेत. एस. टी. गाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी आहेत की प्रवाशांची गैरसोय करण्यासाठी असा ज्वलंत प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे. या सर्व गोष्टींमुळे अनेक प्रवासी आता खासगी वाहनांकडे वळले आहेत. बहुजन हितास बहुजन सुखाय हे वाक्य आता लोक विसरू लागले आहेत. रोहा आगार जर प्रवाशांना आर्थिक भुदंड देत असेल तर मंत्र्यांकडे तक्रार देणार असल्याचे अनेक प्रवाशांनी तीव्र शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.

तुम्हाला आरक्षण करायचे असेल तर ऑनलाइन करा असे सांगितले जाते. परंतु डोंगराळ भागात रेंज नसते हे त्यांना माहीत असूनही प्रवाशांना उडवाउडवीची उत्तरे देतात.तसेच सर्वांकडे एनरोड मोबाईल असतोच असे नाही त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे असे किती दिवस चालणार एकतर सुतारवाडी मार्गे पुणेकडे जाणारी आणि पुणे येथून येणारी एकच एस.टी. आहे. ती चुकली तर विळे येथे जावे लागत आहे. खर्चीक वाहनातून विळेपर्यंत जावून तेथून माणगावकडून येणार्‍या एसटीची प्रतिक्षा करावी लागत आहे. रोहा आगराने प्रवाशांचे होणारे हाल लक्षात घेवून कोलाड वाहतूक नियंत्रकाद्वारे आरक्षणाची व्यवस्था करावी तसेच जिथून जायचे आणि ज्या ठिकाणी जायचे तेथील आरक्षण द्यावे या गोष्टी लवकर प्रवाशांना घाव्यात. अन्यतः स्थानिक आमदार तसेच परिवाहन मंत्र्यांकडे लेखी तक्रार करण्यात येईल असा इशारा स्थानिक प्रवाशांनी केला आहे.

Exit mobile version