संबंधित विभागाचे दुर्लक्ष, खापर मात्र फक्त ठेकेदारावर
। चणेरा । वार्ताहर ।
रोहा नागोठणे रस्त्यावर अष्टमी हद्दीत रेल्वे क्रॉसिंग वर उड्डाणपुलाचे काम प्रगती पथावर आहे. या ठिकाणी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेले असून या दुरअवस्थेत सार्वजनिक बांधकाम विभाग, एमआरआयडीसी (महारेल) व रेल्वे विभाग हे खाते जबाबदार आहेत. मात्र उठसूट उड्डाणपुलाच्या ठेकेदारावर खापर फोडले जात असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. सदर रस्त्याला राज्य महामार्गाचा दर्जा दिला असून या रस्त्यावरून अवजड वाहनांची संख्या वाढली आहे.
रस्त्याची क्षमता नसल्यामुळे रस्ता खचत आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वेने रस्त्याचे तपशील पडताळणे गरजेचे आहे. ठेकेदाराने कितीही रस्ता दुरुस्त केला तरीही प्रचंड पडणारा पाऊस व अवजड वाहने त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्यास प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे विभाग, आर. के. मदानी, एमआरआयडिसी (महारेल) यांनी लक्ष घालावे अशी मागणी प्रवासी वर्गाने केली आहे.
रोहा-नागोठणे रोडवर पिंगळसई व पडमजवळ रेल्वे क्रॉसिंगवर फाटक पडत असल्याने रस्त्यावरून जाणार्या प्रवाशांना व नागरिकांना ताटकळत उभे राहावे लागत होते. गेल्या अनेक वर्ष हा विषय प्रलंबित होता. उड्डाणपूलाचे काम आर. के. मदानी या ग्रुपला देण्यात आले. गेली अडीच वर्षे उड्डाणपूलाचे काम सुरू असून अधिकारी वर्ग, कर्मचारी शर्तीचे प्रयत्न करुन पुलाचे काम पूर्णत्वास नेण्याकरिता प्रयत्नशील आहेत.
याच उड्डाणपूलाच्या जवळील पर्यायी रस्त्यांची खुप मोठी दुरवस्था झाली आहे. सदर रस्ता सुस्थितीत ठेवण्याकरिता ठेकेदार शर्थीचे प्रयत्न करित आहेत. मात्र पाऊस प्रचंड असल्याने कमी अधिक प्रमाणात यश येत आहे. वास्तविक पाहता रेल्वे उड्डाणपूलाचे काम आर. के. मदानी या ग्रुपने घेतले असले तरी रोहा-नागोठणे रस्त्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग, रेल्वे विभाग व एमआरआयडीसीने (महारेल ) यांनी घेतली पाहिजे अशी मागणी प्रवासी वर्ग करत आहेत .