। रोहा । वार्ताहर ।
एका 11 वर्षीय चिमुरडीवर लैगिंक अत्याचार केल्याची संतापजनक घटना रोहा शहरापासून जवळ असलेल्या वरसे गावात घडली. या घटनेनंतर सर्वत्र संपताची लाट पसरली असून या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, म्हणून ग्रामस्थांनी मंगळवारी (दि.7) रात्री रोहा पोलीस ठाण्यात जमा होऊन हल्लाबोल करत आपला संताप व्यक्त केला. पोलिसांनी तात्काळ मुख्य आरोपी व आरोपीला सहकार्य करणार्या त्याच्या दोन भावांना अटक केली आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पीडित मुलीच्या घरी भेट देत घटनेबद्दल अधिक माहिती जाणून घेतली. तसेच हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला कठोर शिक्षा होईल, यासाठी नक्कीच प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. तर दुसरीकडे जिल्हा पोलीस अधीक्षक गावात अल्याची माहिती समजताच ग्रामस्थ वर्ग विशेषतः महिलांनी उपस्थित राहून आरोपीला गोळ्या घालून मारा, अशी मागणी करत बदलापूर घटनेची माहिती करून देत आपला संताप व्यक्त केला.
या घटनेतील तेजस गणेश पडवळ (30), रा. वरसे, ता. रोहा असे आरोपी व्यक्तीचे नाव असून 30 डिसेंबर रोजी त्याच्या शेजारी राहणारी एक 11 वर्षीय अल्पवयीन मुलगी हि दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घरासमोरील रस्त्यावर सायकल चालवत होती. यावेळी आरोपी तेजस याने त्याची पत्नी घरात नसताना अल्पवयीन मुलीला घरात बोलावून तिच्याशी गैरकृत्य केले. हि बाब कोणाला सांगितले तर तू व तुझी आई दोघेही मराल असे धमकावून घरी पाठवून दिले. आरोपीने असे वर्तत दोन-चार वेळा केल्याने पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार आपल्या काकीला सांगितला. नंतर या घटनेची माहिती पीडित मुलीच्या आई-वडिलांना समजली. याबाबत आरोपी व त्याच्या भावाला जाब विचारला असता आरोपी तेजस पडवळ याने पीडित मुलीच्या आई, बाबा, काका व काकींना शिवीगाळ करून मारहाण केली.
या घटनेची तक्रार देण्यासाठी सर्वजण गाडीत बसून पोलीस ठाण्यात जात असताना आरोपी तेजस गणेश पडवळ, अनुप गणेश पडवळ, दैनिक गणेश पडवळ यांनी आपसात संगनमत करून दुचाकीवरून त्यांचा पाठलाग केला. तसेच पोलिसांत तक्रार करु नये यासाठी पीडित मुलीच्या वडिलांना व काकांना मारहाण केली.
या घटनेत पल्लवी नारायण पडवळ, नारायण कानू पडवळ व जितेंद्र कानू पडवळ हे तिघेजण जखमी झाले. याबाबत पीडित मुलीच्या आईने रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी आरोपी तेजस पडवळ, अनुप पडवळ व दैनिक पडवळ यांच्या विरोधात पोक्सो, मारहाण व शिवीगाळ करणे इत्यादी कलमानव्ये गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
विकृतीला ठेचून काढा
या घटनेनंतर वरसे गावात तणावाचे वातावरण पसरले आहे. आरोपी हा विकृत पद्धतीने नेहमी वागत असल्यामुळे त्याचा बदलापूर घटनेप्रमाणे इनकाउंटर करून या विकृतीला ठेचून काढा, अशी मागणी गावातील संतप्त महिलांनी पोलीस अधीक्षकांना समोर केली.
ही घटना निंदनीय असून तुम्ही विचलित होऊ नका. या घटनेतीला आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, याकरिता सर्व साक्षी पुरावे गोळा करून न्यायालयात तातडीने दोषारोपपत्र दाखल करून सदर खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा होईल अशा पद्धतीने पोलीस प्रशासन गतिमान पद्धतीने काम करेल. येथील उप अधीक्षक, पोलीस निरीक्षक व ग्रामस्थ तुमच्या सोबत आहेत आणि पोलीस प्रशासन तुम्हला नक्कीच सहकार्य करेल.
सोमनाथ घार्गे,
जिल्हा पोलीस अधीक्षक