फरार आरोपींना अटक; चार दिवसांची पोलीस कोठडी
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील सारसोली गावालगत ओहल्याचे कातळ फोडण्यासाठी सुरुंग लावून कोणत्याही प्रकारची खबरदारी न घेतल्याने झालेल्या स्फोटात एका दहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला, तर एक आठ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना 14 जून रोजी घडली होती. या दुर्घटनेनंतर रोहा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दुर्घटनेतील फरार आरोपींचा शोध लावण्यात यश आले असून, आरोपींना गुरुवारी (दि.20) आलिबाग न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
चणेरा भागातील सारसोली गावात 14 जून रोजी सुरुंग स्फोट होऊन खंदार आदिवासीवाडी येथील सुभाष रमेश पवार (10) या मुलाचा मृत्यू झाला. आर्यन संजय जाधव (8) हा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर मंगेश गणेश पवार (रा. खंदार आदिवासी वाडी-चणेरा) यांनी रोहा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. जमीन मालक दत्ताराम कृष्णा चाळके व अन्य अज्ञात व्यक्तीविरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेतील अन्य दोन आरोपी फरार झाल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्क वेगाने फिरवत आरोपी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील फडकेवाडी या गावात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापला रचून दत्तात्रेय जयसिंग यादव व सुभाष लक्ष्मण चव्हाण यांना सोमवारी (दि.17) अटक केली.
या दोन्ही आरोपींना गुरुवारी (दि.20) न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक देवीदास मुपडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद वायंगणकर करीत आहेत.