वाढत्या उकाड्याने रोहेकर हैराण

ज्यूस, ताक, लस्सी आदी शीतपेयांची मागणी

। रोहा । वार्ताहर ।

दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने रोहेकर हैराण झाले आहेत. तापमानाचा पारा 40 अंशापेक्षा जास्त गेला असल्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे शीतपेयांना मागणी वाढली आहे. रोहा तालुक्यासह संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस उष्णतेचे प्रमाण वाढत आहे.

यामुळे वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे शरीराचा दाह कमी करण्यासाठी शीतपेय, ज्यूस, ताक, लस्सी याकडे नागरिकांचा कल वाढताना दिसून येत आहे. उष्णतेचा पारा 40 अंशाच्या वर गेल्याने सकाळी दहा वाजल्यापासून उन्हाचे चटके बसू लागले आहेत. भरमसाठ वृक्षतोड व दिवसेंदिवस लावले जाणारे वणवे यामुळे वनसंपदा नष्ट होत असल्यामुळे परिसर व रस्ते आग ओकत आहेत. वाढते प्रदूषण व सतत होणार्‍या पर्यावरणाच्या र्‍हासाने जंगले ओस पडू लागली आहेत. त्यामुळे गुरांच्या चार्‍याचा प्रश्‍न भेडसावू लागला आहे. शहरात कुलर खरेदीच्या संख्येत वाढ झाली आहे. तसेच रसाळ फळांना मागणी वाढली आहे. उष्यापासून बचाव होण्यासाठी अनेकजण सकाळी अकराच्या आतमध्ये आपापली कामे आटोपून घेत आहेत. दुपारी मार्केट परिसर ओस पडू लागले आहेत. संध्याकाळी नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. येथील विहिरीमध्ये दुपारी उष्म्यापासून बचावासाठी अनेकजण पोहण्याचा आनंद घेताना दिसून येत आहेत.

Exit mobile version