रोहेकरांची पाण्यासाठी वणवण

। रोहा । प्रतिनिधी ।
कुंडलिका नदीकिनारी असलेल्या रोहा शहराचा पाणी पुरवठा तांत्रिक बिघाडामुळे मागील चार दिवसांपासून बंद असल्याने रोहा शहरातील नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू असून रोह्यातील नागरिक सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या नावाने उघडपणे शिमगा करत आहेत.
रोहा शहराला डोलवहाळ येथील धरणातून पाणी पुरवठा करण्यात येतो.1997 साली तेरा कोटी रुपयांची योजना रोहा शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी राबविण्यात आली आहे. सदर योजनेच्या माध्यमातून शहरात पाणी पुरवठा होत असला तरी दर महिन्याच्या 15 व 30 तारखेला जलवाहिनी दुरूस्ती व मेंटेनन्स साठी मागील दोन वर्षं पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येतो. तरी देखील 15 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा बंद करून दुरुस्तीचे काम वेळेत पूर्ण झाले नसल्याने 16 तारखेला देखील पाणीपुरवठा होणार नसल्याचे रिक्षा फिरवून संपूर्ण शहरात सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र 18 तारीख आली तरी जलवाहिनी दुरुस्तीचे काम संध्याकाळी उशिरा पर्यंत पूर्ण झालेले नसल्याने रोहेकर नागरिकांना ऐन थंडीत पाण्यामुळे घामाघूम होण्याची वेळ आली आहे.
नदी संवर्धन प्रकल्प शहराला लागून असलेल्या कुंडलिका नदीवर राबविण्यात आला आहे.पण सदर प्रकल्प राबवत असताना शहरातील सांडपाणी प्रक्रिया न करता थेट नदीत सोडले जात असल्याने नदीच्या पाण्याचा रोहेकर नागरिकांना वापर करता येत नसल्याचे दिसून येत आहे.शहरातील जुन्या बोअरवेल नादुरुस्त झाल्या असून त्यांचा मेंटेनन्स होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे.घरातील सर्व लहान थोर मंडळी पाण्याच्या शोधात वणवण फिरत असून पाणी नसल्याने पाणी पुरवठा करणार्‍या टँकर चालकांची मात्र चलती झाली आहे.

Exit mobile version