रोहेकरांची सुरक्षा ऐरणीवर

सीसीटीव्ही कॅमेरे बंद; पोलिसांची संख्याही कमी
। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा शहरात नवीन कार्याचा शुभारंभ धडाक्यात साजरा करण्यात येतो. पण हा आरंभशूरपणा काही दिवसातच पोकळ असल्याचे चित्र वारंवार दिसून येते. शहराच्या सुरक्षिततेसाठी लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांपैकी 75 टक्के कॅमेरे बंद आहेत. यावरुन शहरावर लक्ष ठेवण्यासाठी लावण्यात आलेला तिसरा डोळा कुचकामी ठरत असल्याचे दिसून येत आहे. तसेच पोलीस ठाण्यासाठी आवश्यक पदसंख्येपैकी निम्म्याहून अधिक पदे भरण्यात आलेली नसल्याने सुरक्षा धोक्यात आहे.

शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर गुरे चोरणार्‍या टोळ्या सक्रीय असल्याचे वारंवार दिसून आले आहे. भुवनेश्‍वर विभागात किरकोळ चोर्‍या होत आहेत. या चोरांनी आपले लक्ष आता शासकीय कार्यालयाकडे वळवले आहे. पंचायत समितीच्या कार्यालयातील सर्व खिडक्यांच्या काचा तोडून चोरीचा प्रयत्न या चोरांनी केला आहे. यामुळे शासकीय कार्यालयातील संगणक व महत्वाची कागदपत्रे यांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. सीसीटीव्हीही बंदवस्थेत तर पोलिसांची पदे देखील रिक्त आहेत. यामुळे आगामी गणपती गौरीच्या सणात या भुरट्या चोर्‍या करणार्‍यांना रान मोकळे मिळणार आहे. रोहा तालुक्याला खंडीभर लोकप्रतिनिधी आहेत पण जनतेची सुरक्षितता याकडे त्यांचे लक्ष दिसून येत नसल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

रोहा पोलीस ठाण्यात सध्या एकूण मंजूर पदांपैकी केवळ 30 पदे भरलेली आहेत. उर्वरित पदे लवकरच वरिष्ठ कार्यालयातून भरण्यात येणार आहेत. शहरात नगरपालिकेकडून लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यांपैकी काही कॅमेरे बंद आहेत. पण त्याची देखभाल दुरुस्ती करण्याचे काम रोहा नगरपालिका प्रशासनाचे आहे.

– श्री. बाबर, रोहा पोलीस निरीक्षक

रोहा नगरपालिका हद्दीतील सीसीटीव्ही कॅमेरे किती आहेत व त्यांची सद्यस्थिती काय आहे याबाबत माहिती घेऊन सांगण्यात येईल.

– धीरज चव्हाण, मुख्याधिकारी, नगरपालिका, रोहा
Exit mobile version