। मुंबई । प्रतिनिधी ।
कांद्याला चांगला भाव मिळाला की शेतकरी कांदाच पिकवतो आणि कांद्याचे भाव कोसळतात, असे वादग्रस्त विधान करत राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर थेट नाराजी व्यक्त केली आहे. कोकाटेंनी हे ब्रह्मज्ञान केंद्र सरकारला द्यावे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. तसेच, अजित पवारांनी शेती समजणाऱ्या व्यक्तीला हे खातं द्यावे अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटले आहे की, कांद्याला चांगला भाव मिळाला की शेतकरी कांदाच लावत सुटतात आणि कांद्याचे भाव पडतात हा तर्क आहे महाराष्ट्र राज्याचे महान कृषिमंत्री कोकाटे साहेबांचा. तसेच, कांद्याचे दर थोडेफार उत्पादन वाढल्याने पडत नाहीत तर केंद्र सरकारच्या निर्यातबंदी, निर्यातशुल्क यासारख्या धोरणांमुळे आणि झोपलेल्या राज्यसरकारमुळे पडतात. त्यामुळे राज्याच्या कृषिमंत्र्यांनी आपले ब्रम्हज्ञान शेतकऱ्यांना देण्याऐवजी केंद्र सरकारला दिले तर अधिक बरे होईल, असे रोहित पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, कृषिमंत्री पद हे अत्यंत जबाबदारीचे पद आहे. परंतु, विद्यमान कृषिमंत्र्यांना मात्र त्यांची जबाबदारी अजूनही समजलेली दिसत नाही, त्यामुळे नेतृत्वाने कृषिमंत्र्यांची राजकीय काळजी करण्यापेक्षा शेतकऱ्यांची काळजी करावी. तसेच, अजितदादांनी धाडसी निर्णय घेऊन ज्याला शेतीची समज आहे, संवेदना आहे अशा जबाबदार व्यक्तीकडे कृषिमंत्री पद सोपवायला हवे, असेही रोहित पवार म्हणाले.