| मुंबई । वृत्तसंस्था ।
टी-20 विश्वचषक 2022 च्या सेमीफायनलचा थरार सुरू झाला आहे. टीम इंडिया 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध अॅडलेड ओव्हलवर मैदानात उतरणार आहे. मात्र सकाळी सराव करत असताणा टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता. कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी झाला ही बातमी आली होती. रोहित शर्माच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याने टीम इंडियाचं टेन्शन आले होते. मात्र, काही वेळात तो पुन्हा सराव सत्रासाठी मैदानात आला.
अॅडलेडमध्ये टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल सामना खेळायचा आहे. सकाळी सराव सत्रादरम्यान रोहित नेटवर फलंदाजी करत होता. यादरम्यान थ्रो-डाउन स्पेशालिस्टचा लेन्थ बॉल त्याच्या हाताला लागला. यानंतर रोहित वेदनेने ओरडताना दिसला. त्याला ताबडतोब नेट सेशन मध्येच सोडावे लागले. यानंतर फिजिओने त्याला मैदानावर उपचार दिले. रोहित आणि टीम इंडियाचं प्रतिक्रिया पाहता दुखापत गंभीर असू शकते असे वाटले पण चांगली गोष्ट म्हणजे थोड्या विश्रांतीनंतर हिटमॅन पुन्हा नेटवर सराव करताना दिसला.
उपांत्य फेरीत टीम इंडिया 10 नोव्हेंबरला इंग्लंडविरुद्ध खेळणार आहे. टी-20 विश्वचषक स्पर्धेत ब गटातून भारत आणि पाकिस्तानने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्याचबरोबर न्यूझीलंड आणि इंग्लंडचे संघ अ गटातून पोहोचले आहेत. पहिला उपांत्य सामना 9 नोव्हेंबरला न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे.