। न्यूयॉर्क । वृत्तसंस्था ।
विश्वचषकामध्ये 9 जून रोजी भारत विरुध्द पाकिस्तान सामना रंगणार आहे. न्यूयॉर्कमध्ये खेळल्या जाणार्या या सामन्यापूर्वी रोहित शर्माच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचे टेन्शन खूपच वाढले आहे. पण, त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे रोहित शर्मा हा पुन्हा फलंदाजी करताना दिसला आहे. खरं तर, डाव्या हाताला दुखापत झाल्यानंतर तो वेदनेने कळवळत होता, ते पाहून फिजिओ टीम त्याच्या दिशेने धावत आली. फिजिओने उपचार दिल्यानंतर रोहित पुन्हा नेटमध्ये फलंदाजी करताना दिसला. रोहित शर्माला याआधी आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात खांद्याला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला तिथेही मैदान सोडावे लागले होते.
रोहितला कशी झाली दुखापत? सरावादरम्यान, रोहित शर्माला दुखापत कशी झाली? हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा थ्रो डाउन स्पेशालिस्ट नुवानच्या चेंडूवर फलंदाजी करत होता. त्यावेळी खेळपट्टीवरून एक चेंडू उसळला आणि त्याच्या डाव्या हाताच्या ग्लोव्हला लागला. त्यानंतर त्याला भयानक वेदना झाल्या. मात्र, फिजिओने त्याला तपासल्यानंतर त्याला बरे वाटू लागले. रोहितने पुन्हा फलंदाजीला सुरुवात केली पण यावेळी त्याने आपली बाजू बदलली. म्हणजे दुखापतीनंतर तो दुसर्या टोकाकडून फलंदाजी करत होता. नेटमध्ये आणखी काही वेळ फलंदाजी केल्यानंतर रोहित शर्मा तिथून निघाला.
