| रेवदंडा | प्रतिनिधी |
अलिबाग तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत को. ए. सो. श्रीमती बामीबाई नाना पुनकर हायस्कूल, भिलजी-बोरघर येथील विद्यार्थिनींनी दमदार कामगिरी करत 17 वर्षांखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. या घवघवीत यशामुळे शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, परिसरातून विद्यार्थिनींचे कौतुक होत आहे. या स्पर्धेत भिलजी-बोरघर हायस्कूलच्या मुलींनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास आणि सांघिक भावनेच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघांना कडवी झुंज दिली.
उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत त्यांनी प्रथम क्रमांकावर आपले नाव कोरले. विद्यार्थिनींच्या या यशामुळे शाळेचा नावलौकिक वाढला असून, अन्य विद्यार्थ्यांसाठीही हे यश प्रेरणादायी ठरले आहे. या यशामागे संघाचे प्रशिक्षक किशोर राठोड सर यांचे मोलाचे मार्गदर्शन, सातत्यपूर्ण सराव आणि खेळाडूंनी घेतलेली मेहनत महत्त्वपूर्ण ठरली. योग्य प्रशिक्षण, शिस्त आणि संघभावनेच्या जोरावर विद्यार्थिनींनी हे यश संपादन केले. या कबड्डी संघात अनुष्का कनोजे, मानसी वाघमारे, नव्या झावरे, आर्या पाटील, सई सुभेकर, सफा चौगुले, स्नेहा झावरे, अलीना फक्की आणि वेदा अष्टवकर आदी विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. विद्यार्थिनींनी मिळवलेल्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेच्या वतीने सर्व खेळाडू, प्रशिक्षक किशोर राठोड आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करण्यात येत आहे. भविष्यातही या विद्यार्थिनींनी जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करून शाळेचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.







