किराणा दुकानातून 46 हजार 450 रुपयांचा मुद्देमाल जप्त
| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील निजामपूर नाका परिसरात किराणा दुकानाच्या आडून प्रतिबंधित गुटख्याची विक्री करणाऱ्या 45 वर्षीय राजेश रामकुमार चौधरी याला माणगाव पोलिसांनी अटक केली. या कारवाईत 46 हजार 450 रुपये किमतीचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला.
2 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास निजामपूर येथील राजेश ट्रेडर्स दुकानाला लागून असलेल्या घरातील खोलीत प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर तळेकर आणि पथकाने छापा टाकून हा मुद्देमाल जप्त केला. संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. प्रतिबंधित पदार्थांचा पुरवठा कुठून होत होता आणि त्यांची विक्री कोणाला केली जात होती, याचा पुढील तपास माणगाव पोलीस करीत आहेत.







