| पाली/गोमाशी | प्रतिनिधी |
पालघर येथे संपन्न झालेल्या 53 व्या राज्य अजिंक्य कबड्डी स्पर्धेसाठी शिवकन्या पाली संघाची खेळाडू भूमिका बामगुडे हिची रायगड जिल्हा महिला संघात निवड झाल्याबद्दल तिचा भव्य सत्कार नांदगाव येथे करण्यात आला. भोराई शिक्षण प्रसारक मंडळ, नांदगावचे अध्यक्ष सुरेश खैरे यांच्या शुभहस्ते श्री शारदा मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा चिटणीस शेतकरी कामगार पक्ष, प्राथमिक शिक्षक संजय थळे, सुधीर साखरले इतर मान्यवर उपस्थित होते.
भूमिका बामगुडे ही आपल्या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. तिने लहानपणापासूनच कबड्डीमध्ये नैपुण्य मिळवले असून, शिवकन्या पाली संघाकडून खेळताना अनेक सामने गाजवले आहेत. तिच्या या जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावरच आज तिला जिल्हा संघात स्थान मिळाले आहे, यामुळे नांदगाव, दिघेवाडी, परिसरात आनंदाचे वातावरण आहे. यावेळी बोलताना सुरेश खैरे म्हणाले भूमिकाने गावाचे नाव जिल्ह्यात पोहोचवले आहे, ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. तिने राज्यस्तरावरही अशीच चमकदार कामगिरी करावी आणि जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे. सत्काराला उत्तर देताना भूमिकाने आपले प्रशिक्षक, आई-वडील, ग्रामस्थ मंडळ दिघेवाडी आणि भोराई शिक्षण प्रसारक मंडळाचे तसेच संत नामदेव माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नांदगावचे सर्व गुरुजन वर्ग यांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा भूषण सुतार यांच्या वतीने करण्यात आले. नांदगाव विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी, क्रीडाप्रेमी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.







