रोहित शर्मा नामक फलंदाजीचा जादूगार..

तो खेळतो तेव्हा, त्याचा दिवस असतो. समोरच्या टोकाकडे फलंदाजी करणाराही प्रेक्षक असतो. प्रेक्षकांसाठी मात्र त्याची फलंदाजी पाहणं म्हणजे एक पर्वणीच असते. ज्या पर्वणीच्या पूर्वसूचना नसते. सूर जुळले, मैफल जमली की मग रोहित शर्मा नामक फलंदाजीचा जादूगार आपल्या पोतडीतून एकेक चीजा बाहेर काढत असतो. मागे एक क्रिकेटपटू म्हणाला होता, त्याला चेंडू इतरांपेक्षा आधी दिसतो. त्यामुळे त्याला फटका सहजपणे आणि हवा तसा खेळता येतो. त्यामुळेच त्याच्या फलंदाजीत सहसुंदरता दिसते. त्याच्यासाठी तो खेळलेला फटका किंवा फटक्यांची माळ फार मोठी नसते. मात्र पाहणाऱ्याला त्या फटक्यातील सौंदर्य भुरळ घालते. त्याच्याकडे प्रत्येक फटका मारण्यासाठी असलेला काही सेकंद अवधीचा अवधी, पाहणाऱ्याच्या मनात गैरसमज निर्माण करतो. प्रथम पाहणाऱ्याला तो आळशी, सुस्त वाटतो. प्रत्यक्षात फटके खेळण्यासाठी त्याला अधिक ताकद लावण्याची गरज नसते किंवा अधिक घाई करण्याची निकड नसते. कधी कधी जगातला वेगवान मानव, युसेन बोल्ट, याच्या ‌‘लेझी एलिंगन्स’शी त्याची तुलना करण्याचा मोह आवरता येत नाही. शंभर मीटर्स शर्यतीत, स्टार्टिंग ब्लाकवरून उशिरा बाहेर पडणारा बोर्ल्ड 50 मीटर्स अंतरानंतर सर्वांच्या पुढे कसा असतो हे जसे एक कोडे आहे, अगदी तसंच रोहित शर्माची फलंदाजी पाहताना वाटते. आणि जेव्हा रोहित समोरच्या गोलंदाजीशी खेळायला लागतो, त्यावेळी 100 मीटर्स शर्यतीत अंतिम रेषा पार करण्याआधी मागे वळून पाहणारा बोल्ट आठवतो. षटकार मारताना देखील फारसे श्रम घेतले नाहीत असे वाटते. कव्हर्स आणि मिडऑनच्या पट्ट्यात ड्राईव्हज, मारताना मैदानावर प्रतिस्पर्ध्यांनी त्या जागेवर क्षेत्ररक्षकच उभे केले नाहीत असं क्षणभर वाटतं.

131 धावांच्या झंझावाती डावासाठी त्याला 84 चेंडू पुरे पडले. 63 चेंडूतील त्याचे शतक भारतीयांच्या वेगवान शतकांमध्ये पहिल्या स्थानावर जाऊन बसले आहे. याआधीचा हा उच्चांक कपिलदेवच्या नावावर (1983 विश्वचषक) होता. रोहितने ख्रीस गेल या षटकारांच्या सम्राटाचा ताज देखील 556 वा षटकार मारून खाली खेचला. मात्र विक्रम तोडल्यानंतरही ख्रीस गेल हाच युनिव्हर्सचा षटकार ‌‘हिटर’ असल्याचे त्याने जाहीर करून टाकले. त्याने विश्वचषकातील सचिन तेंडुलकरचा याआधीच्या 6 शतकांचा विक्रमही मोडला. एकदिवसीय क्रिकेट सामन्यातील 31 वे शतक नोंदविताना त्याने विकी पॉन्टींगला (30) मागे टाकले. पहिल्या पॉवरफ्लेमध्ये 76 धावा पटकावून वेगवान धावा काढण्याचा स्वर आणखी उंचावला. विश्वचषकातील चार अंकी धावांची वेस ओलांडण्याचा विक्रमही काल त्याला चिकटला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये एवढा मोठ्या प्रमाणातील विक्रमांची मोडतोड प्रथमच पाहिली.

या विक्रमांची रोहितला गंधवार्ताही नाही. क्रिकेट खेळताना स्कोअरबोर्ड पहायचा नाही, आणि प्रसिद्धी माध्यमात आपल्याबद्दल छापून येतंय ते पहायचं नाही, असा त्याचा खाक्या आहे. तोच आग्रह त्याने आपल्या सहकाऱ्यांनाही केला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरूद्ध सलामीच्या लढतीत शून्यावर बाद झाल्यावर देखील अफगाणिस्तान विरूद्ध सामन्यात तो मुक्तपणे खेळला. 2019 च्या विश्वचषक रोहित शर्माचा होता. त्याआधीचे दोन विश्वचषक हुकल्याचे शल्य त्याला सलत होते. त्या हुकलेल्या संधीचे त्याने पुरेपूर उट्टे फेडले होते. त्याआधी दोन विश्वचषक स्पर्धा हुकल्यामुळे त्याच्यातील फुललेल्या अंगाराची ती परिणीती होती. सुमारे दोन वर्ष फारशा धावा न करताही संघांचे नेतृत्व करणाऱ्या रोहित शर्मासाठी यावेळी तीच गोष्ट प्रोत्साहनकारक ठरली.

Exit mobile version