| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी हार्दिक पांड्या याची निवड करण्यात आली आहे. 2024 मध्ये तो संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारेल. मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाकडून सोशल मीडियावर याबाबतची घोषणा शुक्रवारी करण्यात आली.
रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने सर्वाधिक पाच वेळा आयपीएलच्या जेतेपदावर मोहोर उमटवली. मात्र, हार्दिक पंड्याकडे नेतृत्व सोपवण्याचे कारण मुंबई इंडियन्सकडून सांगण्यात आले की, आम्हाला भविष्यातील संघ घडवायचा आहे. त्यामुळे नेतृत्वबदल करण्यात आलेला आहे. दरम्यान, रोहित शर्माला आता हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात खेळावे लागणार आहे. 2024 मोसम त्याचा अखेरचा असण्याची शक्यता आहे.
रोहित शर्माला मुंबई इंडियन्स संघाच्या नेतृत्वपदावरून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट तो खेळणार का, असा प्रश्न याप्रसंगी निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच रोहित शर्माने पुनरागमनाचे संकेतही दिले. एकदिवसीय विश्वकरंडक लांबणीवर आहे. त्यामुळे सध्या तरी त्याने टी-20 विश्वकरंडकाबाबत मत व्यक्त केले, असे म्हणायला हरकत नाही. प्रत्यक्षात त्याने टी-20 क्रिकेटमध्ये खेळणार की नाही, याबाबत काहीच सांगितलेले नाही. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने 2013, 2015, 2017, 2019, 2020 साली विजेतेपद पटकावले आहे.
मुंबईचे फॉलोअर्स घटले आयपीएलमध्ये सलग दहा वर्षे मुंबई टीमचं कर्णधारपद सांभाळणाऱ्या रोहित शर्माला काढून त्याजागी हार्दिक पंड्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे मुंबई इंडियन्सच्या अनेक चाहत्यांनी मुंबई इंडियन्सचं इन्स्टाग्रामवरील खाते अनफॉलो केले आहे. परिणामी मुंबई इंडियन्सच्या इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्स कमी झाले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, मुंबई इंडियन्सचे इन्स्टाग्रामवरील 1.5 लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत. याचा फायदा चेन्नई सुपर किंग्सला झाला आहे.