भंगार वादातून रोह्यात दमबाजी

मॅटर सुटत नाही तोपर्यंत राडे चालूच राहणार

। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील विळे भागात औद्योगिक वसाहती मधील भंगार खरेदीसाठी स्थानिक पुढारी वर्गात वरिष्ठांच्या मूक पाठिंब्यावर राडेबाजी सुरूच आहे. मॅटर सुटत नाही तोपर्यंत असेच चालू राहणार असे बोलत चार जणांनी एका ट्रेलर चालकाला मारहाण करत त्याच्या गाडीचे नुकसान करत पोबारा केला आहे.

शुक्रवारी आपल्या ताब्यातील वाहन घेऊन ट्रेलर चालक पोस्को कंपनीतील भंगार घेऊन जात असताना चार जणांनी दुचाकी आणि एका कारमधुन येत भिरा कोलाड रस्त्यावर आपल्या दुचाकी ट्रेलर समोर लाऊन भर दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ट्रेलर अडवून चालकाला मारहाण केली आहे. संबंधित इसमानी ट्रेलर चालकाच्या गाडीच्या काचा लाकडी दांडक्याने फोडल्या असून चालकाच्या खिशातील दोन हजार रुपयांची रोख रक्कम देखील पळवून नेली. फिर्यादी सुनिल रामनारायण गिरी रा तासगाव, ता.माणगाव हा त्याच्या ताब्यातील ट्रेलर एम एच 06 बी डी 5060 घेऊन भंगाराचा माल घेऊन कोलाड बाजूकडे जात असताना एक दुचाकीस्वार तसेच कार क्रमांक एम.एच. 14 जी.एन. 7627 या गाडीतील अन्य तीन इसम यांनी भिरा कोलाड रस्त्यावरील रेल्वे ट्रॅक परिसरात सदर गाडी अडवून त्याची नासधूस करत असताना विकास शेठ व बाबू शेठ यांच्या गाड्या फोडल्या. मॅटर सुटत नाही तोपर्यंत असेच चालू राहणार असे सांगत दमबाजी करत चालकाच्या खिशातील 500 रुपयांच्या चार नोटा एकूण दोन हजार रुपये घेऊन पोबारा केला आहे.

भर दुपारी झालेल्या मारहाणीमुळे ट्रेलर चालकांमध्ये भितीचे वातावरण आहे. याबाबत कोलाड पोलीस ठाण्यात भादवि कलम 392, 341, 427, 34 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोउनि ए. एल. घायवट सपोनि जाधव तसेच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करीत आहेत.

Exit mobile version