रूमानियाचा विजयी धडाका

। म्युनिक । वृत्तसंस्था ।

युरो करंडक फुटबॉल स्पर्धेत रुमानियाचा संघ मागील वेळेस पात्र ठरला नव्हता, यावेळेस त्यांनी धडाकेबाज पुनरागमन साजरे करताना युक्रेनवर सोमवारी 3-0 असा दणदणीत विजय नोंदविला. ई गटातील या लढतीत रुमानियाने पूर्ण वर्चस्व राखले. त्यांच्यासाठी कर्णधार निकोलाय स्टानसियू, राझवान मारिन व डेनिस ड्रागस यांनी प्रत्येकी एक गोल केला.

युद्धग्रस्त युक्रेनने तीन वर्षांपूर्वीच्या युरो करंडकात उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, यावेळी गट साखळीतील पहिल्या लढतीत त्यांना प्रभाव पाडता आला नाही. कर्णधार निकोलाय स्टानसियू याने सणसणीत फटक्यावर रुमानियाने 29व्या मिनिटास गोलशून्य बरोबरीची कोंडी फोडली. युक्रेनच्या गोलरक्षकाच्या गोलकिकवर रुमानियाच्या डेनिस मॅन याने चेंडू नियंत्रित केला. त्याने कर्णधारास चेंडू पुरविला. यावेळी 31 वर्षीय खेळाडूने लाजबाव फटक्यावर संघाला आघाडी मिळवून दिली.
विश्रांतीनंतरच्या खेळात रुमानियाने चार मिनिटांत दोन गोल नोंदविल्यानंतर युक्रेनच्या आव्हानातील हवाच निघाली. 53व्या मिनिटास राझवान मारिन याने 22 मीटरवरील झंझावाती फटक्यावर केलेला गोल डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. नंतर 57व्या मिनिटास प्रतिहल्ल्यावर डेनिस ड्रागस याने दूरवरील फटक्यावर प्रेक्षणीय गोल नोंदविला. यावेळीही डेनिस मॅन याचे असिस्ट निर्णायक ठरले. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये बदली खेळाडू रोमन यारेमचुक याचा जोरदार फटका क्रॉसबारला आपटल्यामुळे पिछाडी कमी युक्रेनची अखेरची संधीही हुकली.

Exit mobile version