रोनाल्डोचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले

पेनल्टी शूटआउटमध्ये 5-3 ने नमविले

। हॅम्बर्ग । वृत्तसंस्था ।

दोन वर्षांपूर्वी विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम लढतीत अर्जेंटिनाने फ्रान्सला पेनल्टी शूटआऊटवर नमविले होते, त्या स्मृतींना तिलांजली देत फ्रेंच संघ युरो करंडकाच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे.

यावेळची युरो करंडक फुटबॉल स्पर्धा 39 वर्षीय पोर्तुगीज सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी अखेरची मानली जाते, त्या पार्श्‍वभूमीवर निरोपाच्या स्पर्धेत विजेतेपद जिंकण्याचे त्याचे स्वप्न भंगले. दोन वेळच्या माजी विजेत्या फ्रान्सने अटीतटीच्या लढतीत निर्धारित व अतिरिक्त वेळेतील गोलशून्य बरोबरीनंतर पेनल्टी शूटआउटमध्ये पोर्तुगालला 5-3 असे नमविले. उपांत्य फेरीत आता फ्रान्ससमोर स्पेनचे आव्हान असेल. काही दिवसांपूर्वी राऊंड ऑफ 16 फेरीत पोर्तुगालने पेनल्टी शूटआऊटमध्ये स्लोव्हेनियास हरविले होते; परंतु, उपांत्यपूर्व लढतीत त्यांना फ्रान्सविरुद्ध त्या कामगिरीची पुनरावृत्ती करता आली नाही. स्लोव्हेनियाविरुद्ध विजयाचा शिल्पकार ठरलेला पोर्तुगीज गोलरक्षक दिओगो कॉस्ता यावेळी फटके अडवू शकला नाही.

सर्वाधिक 30 सामन्यांचा मानकरी
रोनाल्डो संघात असताना पोर्तुगालने 2016 साली युरो करंडक पटकावला होता, यंदा आणखी एका करंडकासह निरोप घेण्यासाठी तो इच्छुक होता. सहाव्यांदा युरो करंडक खेळणार्‍या ख्रिस्तियानो रोनाल्डोचा स्पर्धेतील हा एकंदरीत 30 वा सामना ठरला. असा पराक्रम साधणारा तो पहिला फुटबॉलपटू आहे. त्याने स्पर्धेत एकूण 14 गोल नोंदविले आहेत; पण यंदा एकही गोल नोंदवू शकला नाही.

आम्ही चांगला खेळ केला आणि कितीतरी संधी निर्माण केल्या. उत्तम वृत्ती प्रदर्शित केल्याबद्दल मला खेळाडूंचा अभिमान वाटत आहे. आम्ही विजयासाठी लायक होतो आणि हा दुःखाचा क्षण आहे, तरीही खेळाडूंना स्वतःबद्दल अभिमान वाटायला हवा. आम्ही अभिमानाने हरलो आहोत. खर्‍या पोर्तुगीज शैलीत आम्ही सर्वकाही दिले. आम्ही इथेच थांबणार नाही, भविष्यात मुसंडी मारू.

रॉबर्टो मार्टिनेझ,
पोर्तुगालचे प्रशिक्षक
Exit mobile version