स्वित्झर्लंडची 5-4 ने मात
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
युरो कप 2020 मधील स्वित्झर्लंड विरुद्ध फ्रान्स हा सामना फुटबॉल चाहत्यांसाठी खरोखरच डोळ्याचं पारणं फेडणारा ठरला. स्वित्झर्लंडच्या संघाने जग्गज्जेत्या फ्रान्सचा पेनल्टी शूट आऊटमध्ये 4-5 च्या फरकाने धुव्वा उडवत मोठ्या थाटात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
अतिरिक्त वेळ दिल्यानंतरही सामना 3-3 च्या बरोबरीत सुटल्याने पेनल्टी शूट आऊटने सामन्याचा निकाल लावण्यात आला. पेनल्टी शूट आऊटमध्येही अटीतटीचा सामना पहायला मिळाला. मात्र फ्रान्सच्या माबपेचा अगदी शेवटचा शॉर्ट यान सोमेरने अडवला आणि सामना 5-4 च्या फरकाने स्वित्झर्लंडने जिंकला. आता उपांत्यपूर्व फेरीत स्वित्झर्लंडचा सामना स्पेनशी होणार आहे. 1938 नंतर पहिल्यांदाच स्वित्झर्लंडने बादफेरीच्या पुढे मजल मारलीय. तर कोणत्याही मोठ्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीमध्ये स्वित्झर्लंडने धडक मारण्याचा योग हा 67 वर्षानंतर जुळून आलाय. यापूर्वी ते 1954 मध्ये विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत खेळले होते.
स्वित्झर्लंड विरुद्ध फ्रान्स सामन्यामध्ये फ्रान्सचं पारडं जड असेल, असं आधीपासून मानण्यात येत होतं. हे अगदी सामन्याच्या 81 व्या मिनिटापर्यंत दिसून आलं. दोन 3-1 च्या फरकाने फ्रान्स अपेक्षित विजय मिळवले असं मानलं जात असतानाच स्वित्झर्लंडच्या संघाने शेवटच्या दहा मिनिटांमध्ये दोन गोल करत सामना 3-3 च्या बरोबरीत सोडवला. नंतरच्या अतिरिक्त वेळातही कोणत्याही संघाला गोल करता आला नाही. स्वित्झर्लंडने हात फॉर्म कायम ठेवत फ्रान्सलाही धूळ चारण्याचा पराक्रम केला आहे. या पराभवामुळे पोर्तुगालपाठोपाठ फ्रान्सचा दादा संघही स्पर्धेबाहेर फेकला गेला आहे.