। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत सोमवारी मध्यरात्री झालेल्या सामन्यांमध्ये उरुग्वे विरुद्ध पॅराग्वे सामना उरुग्वेने, तर बोलिविया विरुद्ध अर्जेंटिना सामना अर्जेंटिनाने जिंकला. या दोन सामन्यांमध्ये एकूण सहा गोल्स झाले. उरुग्वेने 1-0 च्या आघाडीने पॅराग्वेविरुद्धचा सामना जिंकला. तर, बलाढ्य अर्जेंटिनाने 4-1 ने बोलिवियाचा धुव्वा उडवला.
उरुग्वे विरुद्ध पॅराग्वे सामना अटीतटीचा झाला. या सामन्यात उरुग्वेचा सहज विजय होईल असं मानलं जात होतं. मात्र, पॅराग्वेने त्यांना चांगलेच झुंजवलं. उरुग्वेने या स्पर्धेमधील चार सामन्यांपैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. एका सामन्यात त्यांचा पराभव झालाय तर एक सामना अनिर्णित राहिलाय.
दुसरीकडे बोलिविया विरुद्ध अर्जेंटिना सामन्यामध्ये एकूण पाच गोल्स झाले. त्यापैकी बोलिवियाने एक तर अर्जेंटिनाने चार गोल केले. सामन्याच्या पहिल्या सत्रामध्येच अर्जेंटिनाने 3-0 ची आघाडी घेतली. अर्जेंटिनाच्या संघाच्या सामन्याच्या सहाव्या मिनिटालाचं आपलं गोल्सचं खातं उघडलं. या विजयासहीत अर्जेंटीनाने अ गटामध्ये अव्वल स्थान मिळवलं आहे. अर्जेंटिनाने स्पर्धेमध्ये आतापर्यंत चार सामने खेळले असून, त्यापैकी तीन सामन्यांत त्यांनी विजय मिळवला आहे तर एका सामन्यात ते पराभूत झालेत.